विधिमंडळ अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली?
– आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. आकाश फुंडकर, आ. डॉ. शिंगणे यांच्याही आशा पल्लवीत!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पुढील आठवड्यात सुरू होणार्या विधिमंडळ अधिवेशनाच्या अगोदर राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत आपापल्या ‘गॉडफादर’कडे इच्छुकांनी लॉबींगदेखील सुरू केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोदचे भाजपचे आ. डॉ . संजय कुटे यांना यावेळीही शंभर दिवसाचे मंत्रिपद मिळणार का? याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या, ना त्या कारणाने मंत्रीपदाची चालून आलेली संधी वेळोवेळी हुकलेले मेहकरचे शिंदे गटाचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या आशादेखील पल्लवीत झाल्या असून, खामगाव मतदारसंघातून दोनदा विजयी झालेले भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनाही मंत्रीपदाची आस लागल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटाच्या कोट्यातून आ. डॉ. राजेंद्र शिंदे हेसुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडत भाजपसोबत घरोबा केल्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा दोनदा विस्तार झाला. या विस्तारामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला स्थान देण्यात आले नाही. आता विधिमंडळाचे या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून, अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास आपल्याला स्थान मिळावे, यासाठी इच्छुक आमदारांनी आपआपल्या राजकीय ‘गॉडफादर’कडे जोरदार लॉबिंग सुरू केले असल्याची विश्वसनीय सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जळगाव जामोदचे भाजपचे आ. डॉ. संजय कुटे यांना शेवटचे तीन महिने मंत्रीपदाची व जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही त्यांना शंभर दिवसाचेच मंत्रीपद मिळेल की काय, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून वेगळे झाले, त्यावेळी आ. डॉ. संजय कुटे यांनी राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांचा विशेषदूत म्हणून काम पाहिले होते, कदाचित त्यांना याची पावती मंत्रीपदाच्या रूपाने मिळाल्यास नवल वाटू नये.
विशेष म्हणजे, महायुतीचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विजयी करण्यात आ. डॉ.संजय कुटे यांचा सिंहाचा वाटादेखील राहिला आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्री पदाची संधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून हुलकावणी देत आहे. तिसर्यांदा आमदारकीशिवाय विदर्भातून सर्वात जास्त मताधिक्याने विजय होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. एवढे सारे असताना मंत्रीपद न मिळाल्याची खंत त्यांच्या मनात खदखदणे स्वाभाविक आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आता तरी आपल्याला नक्की संधी मिळेल, अशी आशा त्यांना आहे. परंतु त्यांचे मंत्रीपद केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरच अवलंबून आहे, हेही तेवढेच खरे. लोकसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात ना. जाधव यांना अवघ्या २७३ मतांचा मिळालेला लीड मंत्रीपदाच्या आडवा येतो का? यावरही बरेच खल सुरू असल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती असली तरी लोकसभेचे गणित विधानसभेत लागू होत नाही, हेही तेवढेच खरे. भाजपा नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र तथा खामगाव विधानसभेचे दुसर्यांदा भाजपचे आमदार असलेले अॅड. आकाश फुंडकर हेसुद्धा मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खामगाव मतदारसंघातून ना. जाधव यांना २० हजाराचे वर मताधिक्य मिळाले असून, इथूनच ना. जाधव यांच्या विजयाचा गुलाल उधळला गेला. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची आस लागणे सहाजिकच आहे. अजित पवार गटाला मिळणार्या मंत्रिपदाच्या कोट्यातून आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनाही संधी मिळण्याची आशा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ. डॉ. शिंगणे हे आमदार असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ना.जाधव हे तब्बल ३० हजाराचे जवळपास मतांनी मायनसमध्ये आहेत. एकंदरीत अजित पवार गटाची मते महायुतीला मिळाली नसल्याच्या भाजपाच्या शंकेला या निमित्ताने पुष्टी मिळत आहे. या बेरीज, वजाबाकीच्या गणितात कोण पास होतो, व विस्तार झाल्यास मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांचे व राजकीय धुरीणांचे लक्ष लागून आहे.