जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे उपोषण!
– धुळे-सोलापूर महामार्गावर ओबीसी आंदोलकांकडून जाळपोळ
– आंदोलनाचा आज सातवा दिवस, हाकेंची प्रकृती खालावली; वडेट्टीवार, आव्हाड, आंबेडकर घेणार भेट
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला उगाच धक्का लागू नये, अशी मागणी करत प्रसिद्ध विचारवंत व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री या गावात उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. हाके यांच्या उपोषणाला ओबीसी बांधवांनी मोठा पाठिंबा दिला असून, ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. राज्य सरकारने कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, त्याबरोबरच लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी, अशी आग्रही भूमिका ओबीसी समाज बांधवांनी घेतली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे आज हाके यांची भेट घेणार आहेत. प्रकाश आंबेडकर देखील त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.
काल, उपोषणाच्या सहाव्या दिवशी हाके यांची प्रकृती खालावली असून, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धारच हाके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हाके यांची मनधरणी करण्यासाठी अनेक राजकीय नेते जालन्यात जाऊन त्यांची भेट घेत आहेत. अंबड शहरांमध्ये आज बंदची हाक दिल्यानंतर या ठिकाणी दुकाने बंद करून ओबीसी आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी आंदोलकांनी सरकारकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असून, सरकारची अशीच भूमिका राहिली तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होती. पण आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत. आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत, म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. आमची दखल नका घेऊ पण व्हीजेएनटी, ओबीसींची बाजू काय आहे, हे तरी समजून घ्यावे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला आहे. महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो, हे कोणी सांगितले? आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मायबाप सरकारने ही गोष्ट समजून घ्यावी. मी घरापासून दूर आलो. तरी जालना, बीड, परभणी भागात गेलेलो आहे. पण महाराष्ट्र शासन खरं बोलायला तयार नाही, ते दूर पळत आहेत, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जी बाजू मांडत आहेत, त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर त्यांना न्याय मिळेल, हे सांगणारे जरांगे पाटील यांचे सल्लागार कोण आहेत? कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत, त्यांचे आचारविचार वेगळे आहेत, असे वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले. ते वडीगोद्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी हाके यांनी गरीब मराठा समाजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे हाच एकमेव उपाय असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा खोडून काढला.
—
केज तालुक्यातून उपोषणस्थळी २०० गाड्यांचा ताफा हजर!
केज तालुक्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी तब्बल २०० गाड्यांचा ताफा दाखल झाला आहे. मागील ७ दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी जालन्याकडे कूच केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असून, मी हाके यांच्याविषयी काहीही बोलणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा लक्ष्मण हाके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मनोज जरांगे हा भंपक माणूस असून, त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी आहे का? असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते.