‘नाफेड’ची ज्वारी खरेदी ‘लेट’!; पेरणी तोंडावर आल्याने मोत्यासारखी पांढरीशुभ्र ज्वारी मातीमोल भावात व्यापार्यांच्या घशात!
– हंगाम संपल्याने रब्बी ई-पीक पाहणी अॅपही बंद, शेतकरी संकटात!
– जिल्ह्यात ‘अ’ वर्ग संस्था कार्यरत असताना खरेदी ‘खाजगी’ संस्थांना देण्याचा घाट; पणन महासंघ पदाधिकार्यांनाही जुमानले नाही?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पणन महासंघ व नाफेडकडून ज्वारीला चांगला भाव असल्याने सहाजीकच शेतकर्यांचा कल नाफेडला ज्वारी देण्याचा आहे. यावर्षी नाफेडची ज्वारी खरेदी उशीरा (लेट) सुरू झाली, त्यातच मुदत संपल्याने रब्बी ई-पीक पाहणी अॅप बंद झाले. त्यामुळे ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. परिणामी, शेतकरी संभ्रमाबरोबरच संकटातसुद्धा सापडला आहे. याबाबत जिल्हा पणन अधिकारी यांना विचारले असता, ही जबाबदारी शेतकर्यांची आहे एवढेच सांगून त्यांनी कानावर हात ठेवले. विविध अडचणींमुळे आपण नाफेडला ज्वारी देऊ की नाही, या संभ्रमात नाईलाजाने पेरणी तोंडावर आल्याने शेतकर्यांना मातीमोल भावाने पांढरी शुभ्र ज्वारी व्यापार्यांच्या घशात घालावी लागत आहे. त्यामुळेही शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यात ‘अ’वर्ग खरेदी विक्री संस्था कार्यरत असताना काही खाजगी संस्थांकडून ज्वारी खरेदी करण्यात येत असून, अशा संस्था ठरवताना पणन महासंघाच्या पदाधिकार्यांनादेखील जुमानले गेले नसल्याची खमंग चर्चा सहकार वर्तुळात चवीने चर्चिली जात आहे. तसेच याबाबत कुणाचे खिशे गरम झालेत? याबाबत आश्चर्यही व्यक्त केल्या जात आहे. या सर्व शेतकरी लुटीत स्वतः पणन मंत्र्यांनी लक्ष घालून यातून मार्ग काढत शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. विशेष बाब म्हणजे, याप्रश्नी शेतकरी नेतेही मूग गिळून बसलेले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धक्कादायक बाब अशी, की काल (दि.१३) दिवसभर पोर्टल डाऊन असल्याने शेतकर्यांना नाव नोंदणी करता आली नाही. अजूनही हे पोर्टल डाऊनच दिसून येत होते.
पणन महासंघ व नाफेडकडून ज्वारीला ३ हजार १८० रुपयाचा हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. तीच ज्वारी खुल्या बाजारात १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी केली जात आहे. भावात प्रतिक्विंटल हजार रुपयांच्या वर फरक असल्याने सहाजीकच बहुतांश शेतकर्यांचा कल नाफेडला ज्वारी देण्याचा आहे. त्या दृष्टीने शेतकर्यांनी नोंदणी सुरू केली आहे. यावर्षी बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव या अ वर्ग दर्जा असलेल्या खरेदी-विक्री संस्था सोबतच गजानन महाराज कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रो. उत्पादक कंपनी अंजनी बु. केंद्र साखरखेर्डा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोडूसर कंपनी देऊळगावराजा केंद्र सिंदखेडराजा, नांदुरा अॅग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी ली. नांदुरा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, आर्गत्सव ऑर्गानिक फार्मर प्रोड्युसर कंपनी देऊळगावराजा, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र वरवट बकाल, बिबी फार्मर प्रो. कंपनी बिबी केंद्र बिबी, भक्तीराज फार्मर प्रोडूसर कंपनी लि. मलकापूर, अॅग्रो रूट्स फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड मोताळा, प्रारंभ फार्मर प्रोडूसर कंपनी लि. धाड व कुलभवानी फार्मर प्रोडूसर कंपनी लि. आसलगाव आदींना ज्वारी खरेदीचे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी नाफेडची ज्वारी खरेदी दहा ते बारा दिवस उशिराने सुरू झाली आहे. त्यातच रब्बी ई-पीक पाहणीची मुदत १५ मार्चला संपल्याने सदर अॅपदेखील बंद झाले आहे. याबाबत जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांना विचारले असता ही जबाबदारी शेतकर्यांची आहे, एवढेच सांगून त्यांनी कानावर हात ठेवले.
जिल्ह्यात नाफेडकडून नाव नोंदणी व खरेदीला ८ मेपासून सुरुवात झाली असून, ३० मेपर्यंत नोंदणी व खरेदी सुरू राहणार आहे तर काल १० मेपर्यंत ५३४ शेतकर्यांनी नाव नोंदणी केल्याची माहिती आहे. परंतु यावर्षी खरेदी दहा ते बारा दिवस उशिरा सुरू झाली. त्यातच रब्बी ई-पीक पाहणी मुदत संपल्याने सदर अॅप बंद झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी नाफेडच्या खरेदीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. तर पेरणी जवळ आल्याने नाईलाजाने पांढरी शुभ्र ज्वारी मातीमोल भावाने खुल्या बाजारात व्यापार्यांच्या घशात घालावी लागत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. सध्या उन्हाळी ई-पीक पाहणी सुरू असून, शेतकर्यांनी ऑनलाईन माहिती भरल्यास डीबीए कडून मंजुरी घेऊन सातबारावर ज्वारी पेरा नोंद करता येईल, असे महसूल विभागाच्या एका जबाबदार कर्मचार्याने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. यासाठी मात्र शासनाला सदर आदेश बदलावा लागणार असून, त्यात आणखी वेळ जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात ‘अ’ वर्ग खरेदी विक्री सहकारी संस्था कार्यरत असताना काही खाजगी संस्था संचालकांनी ‘जोर’ लावल्याने अधिकार्यांनीही मग ‘जोर’ देत काही खाजगी संस्थाना ‘ब’ वर्गाचा दर्जा देत ज्वारी खरेदी केंद्र मंजूर करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यासाठी ‘कुणा कुणाचे खिशे गरम’ झालेत? याबाबतची जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, सदर खरेदी केंद्र मंजूर करत असताना पणन महासंघाच्या पदााfधकार्यांनादेखील अधिकार्यांनी जुमानले नसल्याची चर्चा सहकारक्षेत्रात चवीने चर्चिली जात आहे. जळगाव जामोद तालुक्यातील एका खाजगी केंद्राबाबत तर पणन महासंघाच्या एका ज्येष्ठ संचालकाने डीएमओची चांगलीच कानउघाडणीदेखील केल्याची चर्चा विशेषतः सहकारक्षेत्रात सुरू आहे.
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील एकट्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार ०३६ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आल्याचे बाजार समिती सचिव गजानन आमले यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. शेतकरी ज्वारी खरेदीत अशाप्रकारे नागवला जात असताना, शेतकर्यांचे कैवारी म्हणून घेणारे शेतकरी नेते मात्र मूग गिळून बसलेले असल्याने शेतकर्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकर्यांची आठवण फक्त निवडणुकीतच होते का, असा सवालही शेतकरी या नेत्यांना करत आहेत.
————-