सिंदखेडराजा तहसीलमध्ये जातप्रमाणपत्र वाटप रखडले; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
– उत्पन्न दाखलाही मिळत नसल्याची तक्रार; विद्यार्थ्यांचे ‘एडमिशन’ अडचणीत!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचा कारभार एवढा ढेपाळला आहे की, शालेय विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे. तर उत्पन्न दाखल्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याची दखल घेऊन त्वरित जात प्रमाणपत्र निकाली काढावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तालुक्यातील २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतु सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. हे सर्व अर्ज रखडलेले असल्याने विद्यार्थ्यांची एडमिशन प्रक्रिया धोक्यात आली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. लवकरच निकाल लागणार आहे. सीबीएससीमधील निकाल जाहीर झाला आहे. तर दहावीचा निकाल केव्हाही लागू शकतो. यासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतु सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्याच बरोबर उत्पन्न दाखलाहाही महत्त्वाचा असल्याने त्यालाही विलंब लागत आहे. पूर्वी उत्पन्न दाखला हा काही तासांतच मिळत असे. आज मात्र त्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. साखरखेर्डा ते सिंदखेडराजा अंतर ६० किलोमीटरचे असल्याने जाणेयेणे कठीण आहे. एकतर तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस नाही. तुटक तुटक प्रवास करून विद्यार्थी गेला तर अधिकारी ठिकाण्यावर सापडत नाही. सापडला तर निवडणुकीची कामे आहेत, नंतर या असे नकारात्मक उत्तर मिळते. दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र लागते. या सर्व बाबींची दखल घेऊन महसूल विभागाच्या अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र कसे लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
निवडणूक प्रक्रियेत सर्व कर्मचारी असल्याने जातप्रमाणपत्रासाठी विलंब लागत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व कर्मचार्यांना हजर ठेवून कॅम्प आयोजित करण्यात आला आहे आणि जातप्रमाणपत्र मिळेल, याची दखल घेतली जाईल.
– प्रवीण धानोरकर, तहसीलदार, सिंदखेडराजा
शालेय विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी जात आहे. याची दखल महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घ्यावी आणि जातप्रमाणपत्र याच आठवड्यात देण्याची तसदी घ्यावी.
– रामभाऊ जाधव, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, बुलढाणा