झाडे लावण्यासाठी काळ्यामातीऐवजी ठेकेदाराने टाकला दगडी मुरूम!
– डिव्हाडरमध्ये मातीऐवजी दगडी मुरूम टाकून काम थातूरमातूर करण्याचा प्रताप!
अंढेरा (हनिफ शेख) – चिखली -जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (ए) चे काम हे २०१८ वर्षांपासून आजही सुरूच आहे. मागील सहा वर्षांपासून रोडच्या रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि काम करणारे कथलिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मनमानीमुळे अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच धक्कादायक बाब अशी उघड झाली की, डिव्हाडरमध्ये ठेकेदार कंपनीने काळ्या मातीऐवजी चक्क मुरूम टाकला आहे. डिव्हाडर (दुभाजक)मध्ये झाडे लावण्याचे नियोजन असताना ठेकेदाराने अक्षम्य हलगर्जी चालविल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.
देऊळगावमहीजवळील वादग्रस्त ठरलेले रोडच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, रोडच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हाडरमध्ये झाडे लावण्यासाठी असलेल्या जागेत चक्कं ठेकेदाराने दिवसाढवळ्या काळी मातीऐवजी दगडी मुरुम टाकला असून, याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि पदाधिकारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता दिसत आहे.
‘रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हाडरमध्ये माती टाकल्याचे समजताच संबंधित ठेकेदार यांना तात्काळ सूचना देऊन दगडी मुरुम काढून काळी माती टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
– दयाराम कचाले, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग खामगांव
—
झाडे लावण्यासाठी मुरुम हटवून तात्काळ काळी माती टाकण्यात येईल.
– प्रा.संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा
अनेक ठिकाणी रोडचे काम निकृष्टदर्जाचे झाले असून, अनेक ठिकाणी रोड खराब झाला आहे. तसेच रुंदीकरणाचे काम करताना रोडची उंची वाढविल्याने अनेक रोड लगतच्या शेतकर्यांना आपल्या शेतात उतरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसे पाहता राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि पदाधिकारी यांनी रोडलगतच्या शेतकर्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याची, तसेच पावसाळ्यात रोडवरील पावसाचे पाणी लगतच्या शेतकर्यांच्या शेतात घुसणार नाही, याची खबरदारी घेत, रोडलगत नाली करण्याची जबाबदारी असताना आजही रोडच्या दोन्ही बाजूला नाली झालेली नाही.