-कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे विनायक सरनाईक यांची मागणी; खरीप पिकांचे नुकसान आणि आगामी रब्बी हंगामाचा विचार करून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
चिखली (तालुका प्रतिनिधी) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात कृषीमंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. कृषीमंत्री विद्यापीठातील शिवार फेरीच्या कार्यक्रमासाठी आले असताना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यासह घाटावरील बुलढाणा, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्याची मागणी केली. आढावा बैठकीनंतर कृषीमंत्री भरणे यांची भेट घेऊनही सरनाईक यांनी याबाबत सविस्तर मागणी मांडली.
घाटावरील तालुक्यांमध्ये पावसाचा तब्बल ४० दिवसांचा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर व मका या खरीप पिकांवर परिणाम झाला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. पर्जन्यमानातील तूट, पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठे आणि आगामी रब्बी हंगामाची परिस्थिती लक्षात घेता या भागातील शेतकरी संकटात असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
विहिरी, तलाव व इतर जलसाठ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्याने आगामी रब्बी हंगाम घेण्याची परिस्थिती नसल्याचे सांगत, शासनाने केवळ खरीप पिकांच्या नुकसानीचा विचार न करता रब्बी हंगामावर होणारा परिणामही लक्षात घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. पर्जन्यमानाचे अधिकृत पुरावे, पावसाचा खंड आणि पिकांची सद्यस्थिती याआधारे सर्वेक्षण करावे. केवळ औपचारिक पंचनामा प्रक्रियेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली. दुष्काळग्रस्त क्षेत्र निश्चित करताना पर्जन्यमान, पावसाचा खंड, पिकांची अवस्था आणि उपलब्ध पाणीसाठा या वस्तुनिष्ठ निकषांचा विचार करण्यात यावा. खरीप पिकांचे झालेले नुकसान आणि पाण्याअभावी रब्बी हंगाम घेता येणार नसल्याने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गोपाल ढोरे, गजानन कुटे, विलासराव वसू, ज्ञानेश्वर इंगळे, कैलास देशमुख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
घाटाखाली अतिवृष्टी, घाटावर पावसाचा खंड; मदतीत दुजाभाव नको
घाटाखालील काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले, तर घाटावरील तालुक्यांमध्ये प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे स्वरूप वेगवेगळे असले तरी दोन्ही भागांतील शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे मदत व दुष्काळाच्या निकषांमध्ये घाटाखाली आणि घाटावर असा दुजाभाव दिसता कामा नये, अशी भूमिका सरनाईक यांनी निवेदनातून मांडली. चिखलीसह घाटावरील तालुक्यांतील पावसाचा खंड, पर्जन्यमानाची तूट, पिकांची अवस्था आणि आगामी रब्बी हंगामाचा विचार करून या तालुक्यांना दुष्काळाच्या निकषातून वगळता कामा नये, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी केली.
रब्बीसाठी विशेष पॅकेज, पीक विमा आणि वीज सवलतीची मागणी
पाण्याअभावी रब्बी हंगाम घेणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विशेष नुकसानभरपाई पॅकेज जाहीर करावे. शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करून वीज बिलात सवलत द्यावी. पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागील वर्षाचा आणि यावर्षीचा पीकविमा तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
दुष्काळ घोषणेच्या चर्चेने संभ्रम; प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी
अकोला येथील आढावा बैठकीत काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याची चर्चा अफवा असल्याचे कृषीमंत्री ना. दत्तामामा भरणे यांनी स्पष्ट केले. मात्र, दुष्काळ जाहीर झाल्याबाबतची चर्चा आणि त्यावरील कृषीमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत बुलढाणा जिल्हाधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली. दुष्काळ जाहीर झाला आहे की नाही, याबाबतचा संभ्रम दूर व्हावा. अंतिम निर्णय घेताना चिखलीसह घाटावरील तालुक्यांमध्ये झालेला पावसाचा खंड, अधिकृत पर्जन्यमानाची आकडेवारी, पिकांची सद्यस्थिती, जलसाठ्यांची उपलब्धता आणि आगामी रब्बी हंगामाची परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील अनेक भागांत ४० ते ४५ दिवसांचा पावसाचा खंड असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुके दुष्काळाच्या निकषातून वगळता कामा नयेत, अशी भूमिका विनायक सरनाईक यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास हिरावला; आमदार श्वेताताई महाले यांनी मांडली पिकांची व्यथा
यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनीही बुलढाणा जिल्ह्यासह चिखली व बुलढाणा तालुक्यातील कोरड्या दुष्काळाची परिस्थिती कृषीमंत्र्यांसमोर मांडली. मतदारसंघातील पिकांची पाहणी आणि घटणाऱ्या शेतकरी उत्पन्नाचा हवाला देत त्यांनी आढावा बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतातील उभी पिके वाळून गेली असून, वर्षभर कष्ट करूनही अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास हिरावला जाण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामातील नुकसानीबरोबरच आता तलाव व विहिरींमध्ये पाणी अपुरे असल्याने रब्बीची पेरणी कशी करायची, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी आढावा बैठकीत केली. आढावा बैठकीनंतर कृषीमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देतानाही त्यांनी या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.