श्रीहरी विष्णूंची अप्रतिम अशी मूर्ती नागपूरला हलविण्यास सिंदखेडकरांचा तीव्र विरोध!
– जिजाऊ मॉसाहेबांच्या वंशजांसह नाझेर काझी व ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळ परिसरात भारतीय पुरातत्व खात्याकडून सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन भगवान श्रीहरी विष्णू व लक्ष्मीमातेची अप्रतिम अशी मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती ११ व्या शतकातील असल्याचा अंदाज असून, आता ही मूर्ती नागपूर येथे हलविण्याचा प्रयत्न पुरातत्व विभाग करत असल्याची चर्चा आहे. ही मूर्ती सिंदखेडराजा येथून कुठेही अन्यत्र हलवू नये, अशी मागणी सिंदखेडराजावासीयांनी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संपूर्ण मूर्तीत समुद्रमंथनाचे दृश्य अतिशय सुबक आणि कोरीव असे दर्शवलेले आहे. यात भगवान विष्णू शेषनागावर विराजमान होऊन बसले आहेत, आणि लक्ष्मीमाता त्यांच्या चरणाजवळ बसलेल्या आहेत. ही मूर्ती सहा फूट लांब आणि तीन फूट उंच अशी अतिशय भव्य आणि वजनदार असल्याने आज दुपारपर्यंत ही मूर्ती बाहेर काढली जाण्याची शक्यता आहे.
उत्खननात सापडलेली ही मूर्ती येथेच ठेवण्यात यावी, अशी सिंदखेडराजावासीयांची मागणी आहे. त्यामुळे मूर्तीला इतरत्र हलविण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्ती हलविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राजमाता जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी यांनी दिलेला आहे. आज दुपारपर्यंत ही मूर्ती बाहेर काढली जाईल. गावकर्यांची अशी मागणी आहे की, ही अतिशय सुंदर मूर्ती असून, हा येथील वारसा आहे आणि त्यामुळे शासनाने या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या संग्रहालयात ही मूर्ती जतन करण्यासाठी ठेवावी. आज सकाळपासून सिंदखेडराजा परिसरातील नागरिक हे उत्खननस्थळी गर्दी करून आहेत. दरम्यान, पुरातत्व खात्याच्या अधिकारीवर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
—-
शेषनागावर विश्राम अवस्थेतील लक्ष्मी सेवारत विष्णू मूर्ती हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, नाभीतून उत्पन्न कमळ आणि त्यावर ब्रह्मदेव विराजमान असे काहीसे या भव्य मूर्तीचे स्वरूप आहे. या मूर्तीच्या प्रभावळ भागात सुंदर, कोरीव समुद्रमंथनाचा देखावा, वासुकी नाग, मूर्तीच्या बैठकीवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याचे बोलले जात आहे.
ही मूर्ती आज बाहेर काढली जाणार असून, नागपूरला हलविण्याच्या हालचाली आहेत, अशी चर्चा आहे.
————-