विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना पटवून दिले बीजप्रक्रियेचे महत्व
– बीजप्रक्रियेमुळे उगवण क्षमता वाढते, रोपावस्थेतील पिकांचे रोगांपासून संरक्षण होते – विद्यार्थ्यांची माहिती
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – बियाण्यांवर पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास बियाण्यांची उगवण चांगली होते व रोपावस्थेत उद्भवणार्या रोगांपासून पिकांचे संरक्षण होते, अशी माहिती विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवरा आश्रम येथील अंतिम वर्षाच्या ‘बळीराजा ग्रूप’च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मेहकर तालुक्यातील ग्राम लव्हाळा येथील शेतकर्यांना बीजप्रकियेचे महत्त्व समजवून सांगताना दिली. या माहितीमुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या ज्ञानात महत्वपूर्ण भर पडली.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे विद्यार्थी लव्हाळा येथे आले असता, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेहकर तालुका अध्यक्ष गणेश गारोळे, तसेच शेतकरी संजय कंकाळ, अनंत कंकाळ, दत्तात्रय कंकाळ, गजानन लहाने, भगवान तायडे, संतोष लहाने, सीताराम खिल्लारे, परशराम कंकाळ, आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी बीजप्रक्रिया व शेतीपिकांचे नियोजन याबाबत शेतकर्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की कोणतेही पीक लावताना आपण जसे जमिनीची पूर्व मशागत करतो, तसेच पिकांमध्ये येणार्या किडीचे व रोगाचे प्रतिबंधात्मक नियोजन करणे फायदेशीर ठरते. यासाठी बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. पीक संरक्षणामध्ये जेवढे महत्व फवारणीमधून कीडरोग नियंत्रणासाठी दिले जाते, तेवढे महत्व बीजप्रक्रियेस दिले जात नाही. बरेच शेतकरी बीजप्रक्रिया करीत नाहीत, बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात. बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यांतून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण सोल्यूबलाझिग बॅक्टरिया (पोटॅश क्षमता वाढविण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रसायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बीजप्रक्रिया असे म्हणतात.
बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक, कीटकनाशक व नंतर जीवाणूसंवर्धकाचा वापर करावा. संवर्धनाची बीजप्रक्रिया केल्यावर बियाणे सावलीत वाळवून लगेचच पेरणी करावी. जमिनीत पोटॅश उपलब्ध असते. पण, ते पिकाला मिळत नाही. या पोटॅशची उपलब्धतता वाढविण्यासाठी पोटॅश सोल्यूबलिझंग (विरघळविणारे जिवाणू) याची प्रक्रिया करावी. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी व रोपावस्थेत उद्भवणार्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम, २ ग्रॅम बाविस्टीन किंवा ट्रायकोडर्मा या जीवाणू बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. तसेच, मुळावरील ग्रंधीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र शोषण्याचे कार्य वाढविण्याच्या दृष्टीने २०-२५ ग्रॅम प्रतिकिलो रायझोबियम जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया केल्यावर बियाणे सावलीत वाळवून लगेचच पेरणी करावी. बीज प्रक्रिया म्हणजे काय, बीज प्रक्रियेचे फायदे, बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती, बीज प्रक्रिया करण्याचा क्रम, इत्यादी बद्दल कृषीदूत विवेक पिंजरकर, दर्शन वैनकर, नीतेश वाकोळे, दीपक ढोबळे, तालापल्ली अनवेश कुमार यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांना विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे, प्रा. मनोज खोडके, प्रा. मंगेश जकाते, प्रा. रवींद्र काळे, प्रा. गजानन ठाकरे, प्रा. रवींद्र काकड, प्रा. समाधान जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.