Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ; ओबीसी आंदोलक उपोषणावर ठाम!
– ओबीसी आंदोलन पेटले, राज्यात ठीकठिकाणी रस्तारोको, निदर्शने
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज (दि.२१) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने या दोघांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. आजच सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आता या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी ५ वाजता ओबीसींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, विजय वडे्टीवार, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे. तसेच लक्ष्मण हाकेंच्या ४ समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश असेल. हाके यांनी मात्र आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. हाके यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत त्यांच्या भेटीसाठी मंत्र्यांचे शिष्टमंडळ पाठवले होते. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर संध्याकाळी ५ वाजता ओबीसींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी महाजन म्हणाले की, एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे. सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान, हाके आणि त्यांच्या सहकार्याची प्रकृती खालावली आहे.
मंत्र्यांच्या भेटीनंतर प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी आरक्षण आणि सगेसोयर्यांबाबत नक्की भूमिका घ्या. आमच्या भवितव्याबाबत सामाजिक मागास घटकांत संभ्रम निर्माण झाला आहे. हा बांधवांचा रोष आहे, भावना आहे, मी मोठा माणूस नाही, आम्ही दोघे उपोषण करणारे मोठ्या बॅकग्राऊंडचे नसून, सामान्य आहोत. आम्हाला कुठल्याही शासकीय अधिकार्यामार्फत अथवा कलेक्टरमार्फत तुम्ही निवेदन पाठवून दिले तरी चालेल. आमच्या सर्व नेत्यांनी आणि गावातील लोकांनी एकत्रित बसावे आणि जालना जिल्ह्यातील काही लोकांनी एकत्रित बसून चर्चा करतील, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, एवढ्या लोकांचा आवाज शासन लोकप्रतिनिधी कसे काय दुर्लक्ष करतात? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा, अशी मागणी प्रा. हाके यांनी यावेळी शिष्टमंडळाकडे केली. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लक्ष्मण हाके यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीला आल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितले, की आम्ही गेले ८/९ दिवस महाराष्ट्र सरकारकडे भूमिका मांडत आलोय. शासन म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आंदोलनकर्ते म्हणतात आम्ही आधीच ओबीसी आरक्षणात आहोत. दोघांपैकी खरं कोण, दोन्ही एकाच वेळी खोटं बोलू शकत नाहीत. ग्रामीण भागातील ओबीसी समाज नाराज आहे. एक दरी या माध्यमातून निर्माण केली जातेय. ठराविक लोकांच्या आंदोलनाला सरकारने रेड कार्पेट घालू नये, आमचा आरोप आहे.
आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतरही यावर तोडगा न निघाल्याने ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. प्रा. हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ओबीसी बांधवही रस्त्यावर उतरला असून, लातूर – सोलापूर महामार्गावरील औसा मोड येथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ‘ज्यांना आरक्षण पाहिजे, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण घेऊ नका,’ अशी मागणी करत आंदोलकांनी एक तास महामार्ग अडवून ठेवला होता. बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथील ओबीसी महिलांसह आंदोलकांनी बीड- अहमदनगर- कल्याण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको केला. या रस्ता रोको केलेल्या ओबीसी आंदोलकांनी थेट ओबीसी नेते छगन भुजबळ यांना फोन केला. आम्हाला जीव देण्याची वेळ आली तर देऊ, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहू, असे आश्वासन यावेळी आंदोलकांनी दिले. परभणीच्या पाथरी येथील ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. यावेळी ओबीसी बांधवांनी एकच पर्व ओबीसी सर्व अश्या घोषणा दिल्या.
-
ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या –
- ओबीसींचे २९ टक्के आरक्षण आहे ते कायम ठेवावे.
- ओबीसी आरक्षणाला हात लागणार नाही, ते लेखी द्यावे.
- ज्या ५४ लाख बोगस कुणबी नोंदी हाताने खाडाखोड करून तयार करणार्यात आल्यात, ते तात्काळ थांबवावे.
- मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावे.
—-