BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

लोकसभेचा पराभव पचवित ‘वंचित’ आता विधानसभेच्या आखाड्यात!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव पचवीत वंचित बहुजन आघाडी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक २२ व २३ जूनरोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार प्रा. वसंतराव मगर यांना आपली अनामत रक्कमदेखील वाचवता आली नव्हती. बहुतांश दलित व मुस्लीम मतदारांनी यावेळेस वंचित आघाडीकडे पाठ फिरवली होती. वंचित आघाडीला मतदान केले तर त्याचा भाजपला फायदा होतो; तसेच, भाजप बहुमताने सत्तेवर आले तर ‘संविधान बदला’ची भीती आहे, ही बाब चर्चेत आल्याने ओबीसी, दलित व मुस्लीम मतदारांनी वंचित आघाडीला मतदान टाळल्याचे निदर्शनास आलेले आहे.
उद्यापासून वंचित आघाडीच्या मुलाखती.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव पहावयास मिळाला. अकोल्यातून राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. परंतु स्वाभिमानी बाणा अशी ओळख असलेल्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पराभव पचवत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लावले. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद या सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. यामध्ये उद्या, २२ जूनरोजी दुपारी १२:३० वाजता बुलढाणा विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृह बुलढाणा तर चिखली विधानसभेसाठी दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह चिखली येथे मुलाखती घेण्यात येणार आहे. दिनांक २३ जूनरोजी दुपारी १२.३० वाजता मेहकर विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृह मेहकर तर दुपारी ३.३० वाजता सिंदखेडराजा विधानसभेसाठी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे सदर मुलाखती पार पडणार आहेत. सदर मुलाखती वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जिल्हा प्रभारी प्रा. धैर्यवर्धन पुंडकर व इतर पदाधिकारी घेणार आहेत. यामध्ये महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सविताताई मुंडे यांचाही समावेश राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी सदर मुलाखती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार घेण्यात येत असून, या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या तयारीला लागली आहे, असे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

दरम्यान घाटाखालील मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव विधानसभेसाठीदेखील उद्या व परवा मुलाखती होणार असून, वंचित आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडेसह इतर प्रमुख नेते हे सदर मुलाखती घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) नीलेश जाधव, महासचिव प्रशांत वाघोदे, महासचिव विष्णू उबाळे, उत्तर जिल्हाध्यक्षसह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांनी मुलाखतीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!