महाराष्ट्रासह चार राज्यांत सप्टेंबरमध्ये निवडणुका शक्य!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – देशातील चार राज्यात यावर्षीच सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना मतदारयाद्या अपडेट करण्याचे आदेश दिले असून, हे काम २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे. मतदार याद्या अपडेट झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांतील निवडणूक तारखांची घोषणा करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत असून, ऑक्टोबर २०२४ पूर्वी निवडणूक घ्यावी लागणार आहे. राज्यात सद्या भाजप-शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत आहे. गेल्या पाच वर्षात राज्याने दोन मुख्यमंत्री पाहिले आहेत. एकूण २८७ सदस्यांच्या या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी १४४ जागांची आवश्यकता आहे. सद्या महाआघाडीकडे १२५ तर महायुतीकडे १६२ सदस्यांचे बळ आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०६ जागा मिळाल्या होत्या. परंतु, मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत फिसकटले होते. त्यामुळे ५६ सदस्यांच्या शिवसेनेला काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ सदस्यांनी पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेवर आले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले होते.
परंतु, मे २०२२ मध्ये राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ३९ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत, भाजपसोबत जाणे पसंत केले होते. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व त्यांना भाजपने पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. परंतु, नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला जोरदार दणका बसला. भाजपला फक्त ९ जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीला ४८ पैकी ३० जागा मिळाल्या. त्यात सर्वाधिक काँग्रेसला १३, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना ८ जागा मिळाल्या, तर भाजप ९, शिंदेसेना ७ व अजित पवार गटाला फक्त एक जागा कशीबशी मिळाली. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता विधानसभेला राज्यातील मतदार काय कौल देतात याकडे देशाचे लक्ष लागून आहे. सद्या तरी महाराष्ट्रातील मतदारांत महायुतीबद्दल चोहीकडे संताप पहायला मिळत असून, लोकसभा निवडणुकीची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
———-
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि झारखंड या चार राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना गुरुवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून निवडणुकीच्या संभाव्य तारखा देण्याची मागणी केली आहे. यानंतर शुक्रवारी काढलेल्या एका निवेदनात, निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदान केंद्रांची ठिकाणे अधिक सोयीची आणि तर्कसंगत असावीत, यासाठी निवडणूक पूर्व विशेष मोहिम २५ जूनपासून सुरू होईल. जुलैच्या कट-ऑफ तारखेसह मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील. २५ जुलै रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर मतदारांना ९ ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी वेळापत्रकानुसार २० ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल.