CrimeMEHAKAR

साखरखेर्डा पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांच्या हिवरा आश्रम परिसरात घरफोड्या!

हिवरा आश्रम, ता. मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांनी वेगवेगळया ठिकाणी घरफोड्या करून अंदाजे ७० हजार ५०० रूपयाचा ऐवज लंपास केला आहे. चोरटे खुलेआम घरफोड्या करत असताना साखरखेर्डा पोलिस मात्र ढाराढूर असून, पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे घरफोड्या करत असल्याने ग्रामस्थ मात्र कमालीचे भेदरलेले आहेत.

सविस्तर असे, की हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेले विशाल विष्णू परिहार हे गावाकडे पेरणीच्या कामानिमित्त गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत, कपाटातील ७ ग्रॅम सोन्याचे मणी डोरले व नगदी रोख ३५०० रुपये असा एकूण ३० हजार ५०० रूपयांचा माल चोरुन नेला. तसेच काशीराम सावळे यांच्या घराचे कुलूप कडीकोंडा तोडून नगदी ५ हजार रुपये व विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. मनोज मुरलीधर मुर्‍हेकर यांची घरासमोर उभी असलेली होंडा शाइन कंपनीची दुचाकी गाडी क्रमांक एमएच २८ व्ही ९४३८ अंदाजे १५ हजार रुपये लंपास केली आहे. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा हिवरा आश्रम येथून जवळ असलेल्या गजरखेड फाट्याकडे वळविला. या फाट्यावर गणेश सोळंकी यांचे वेल्डींगचे दुकान आहे. हे दुकान फोडून वेल्डींग दुकानातील सर्व सामान मशीनसह २० हजार रूपये किंमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला.
हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांनी वेगवेगळया ठिकाणी धुमाकूळ घालून अंदाजे ७० हजार ५०० रूपये किंमतीचा माल लंपास केला. सदर घटनेची तक्रार विशाल विष्णू परिहार यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास साखरखेर्डा ठाण्याचे ठाणेदार स्वप्नील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पोहेकॉ प्रविण गवई हे करीत आहेत. तर मेहकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या हिवरा आश्रम गावाचे पोलीस पाटील रवी घोंगडे यांचे ब्रम्हपुरी फाट्याजवळ पेट्रोलपंप आहे. पेट्रोलपंपाच्या पाठीमागच्या गोठ्यातून दोन मोटारपंप अंदाजे किंमत २० हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी लांबवलेले आहेत. हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली असून, साखरखेर्डा पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!