Head linesMEHAKARVidharbha

अतिक्रमण हटविण्यासाठी शेकडो पेनटाकळी ग्रामस्थांचा साखरखेर्डा पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या!

– शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी ऐरणीवर!

हिवरा आश्रम, ता. मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – येथून जवळच असलेल्या मौजे पेनटाकळी येथे शासकीय गट नं.१२९ व १२५ मध्ये मौजे पेनटाकळी गावाचे स्थलांतर मंजूर असून, सदर जागेवरील अतिक्रमण दि. १४ नोव्हेंबर २०२२ व १५ नोव्हेंबर २०२२ रोजी काढण्यात आले होते. परंतु सदर जागेवर परत गावातील काही कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्यामुळे व सदरचे स्थलांतराचे काम हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे गरजेचे असल्याने सदर जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीकरिता गावातील सुमारे साडेतीनशे महिला व पुरूषांनी १३ जूनरोजी सकाळी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तब्बल दोन तास ठिय्या मांडला होता. दरम्यान, ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी समजूत घातल्याने व संरक्षण देण्याची मागणी मान्य केल्याने ग्रामस्थ परतले होते. तब्बल साडेएकोणवीस एकर जागेवर अतिक्रमण झालेले असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराचा प्रश्न जटील झालेला आहे.

सविस्तर असे, की सन २००६ मध्ये पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे या नदीवर असलेल्या पेनटाकळी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पेनटाकळी गावाला असलेल्या संरक्षक भिंती तुटून गावामध्ये पाणी शिरले व या पाण्यामुळे पेनटाकळी येथील घरे बाधीत झाली होती. परिणामी, सदर गावाचे पुनर्वसन करणेबाबत सचिव ग्रामपंचायत व गावकरी यांनी विनंती केली होती. नियामक मंडळाच्या ठरावामध्ये जलसंपदा खात्यामार्फत धरणाच्या खालील गावाचे पुनर्वसन केले जात नसल्याबाबत कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक २ यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्र. जाक्र. १०५४/ लपवी रेशा / जमीन हस्तांतरण /२०१३, दिनांक १२/०४/२०१३ नुसार कळविले आहे. पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी, कार्यालय, बुलढाणा यांच्यामार्फत मौजे पेनटाकळी गावाचे खास बाब म्हणून शासनास पाठविण्यात आलेला पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन स्तरावरून परत करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
नवीन जागेतील भूखंड वाटप करण्यात आल्यानंतर शासनाकडे स्वाधीन केलेले जुन्या गावठाणातील क्षेत्र समतोल व स्वच्छ करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, पेनटाकळी यांची राहील. मात्र साडेएकोणवीस एकर जागेमध्ये काहींनी अतिक्रमण केल्यामुळे सदर गावाचे स्थलांतर थांबले असल्याने पेनटाकळी प्रकल्पाशेजारी असलेल्या ग्रामस्थांना अपुर्‍या जागेत राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने अतिक्रमण हटविण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी रविंद्र जोगी यांनी आदेश पारित केले असून, अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी मान्य केलेली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी बंदोबस्तासाठी वरिष्ठांकडे दाद मागावी, अशी सूचना ठाणेदार नाईक यांनी ग्रामस्थांना केली होती. यावेळी पेनटाकळीचे सरपंच परमेश्वर वानखेडे, उपसरपंच पुंजाजी इंगळे, सचिव गजानन मवाळ, लक्ष्मीबाई परिहार, बेबी बनसोड, शांताराम वानखेडे, नीताबाई वानखेडे, यमुनाबाई इंगळे, शैलाबाई वानखेडे, मधुकर धोंडगे, पंजाब इंगळे, रामराव गायकवाड, मधुकर इंगळे, पुंजाजी इंगळे, शिवाजी डुकरे, अमोल डुकरे, नारायण गायकवाड, अनंता गवई, मधुकर वानखेडे, रामदास वानखेडे, संतोष वानखेडे यासह साडेतीनशे नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!