चिखलीत विधानसभेसाठी रविकांत तुपकर, नरेंद्र खेडेकरांना ‘नो स्पेस’!
– ‘स्ट्रॉपोल’च्या सर्वेक्षणातून चिखली विधानसभा मतदारसंघाचा कौल उघड!
चिखली (महेंद्र हिवाळे) – अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील यांनाच संधी देण्याची चिखली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची मानसिकता आहे. तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून चांगली मते घेणार्या शेतकरी नेते रविकांत तुपकर व नरेंद्र खेडेकर यांनाही आमदार म्हणून निवडून देण्यास मतदारांची भूमिका नाही, असे ‘स्ट्रॉपोल’ने घेतलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट’्रने हा सर्व्हे घेतला होता. या सर्व्हेनुसार, तब्बल ४८.९२ टक्के लोकांनी श्वेताताई महाले पाटील याच पुन्हा आमदार म्हणून निवडून देण्याची भूमिका घेतली असून, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना ३०.१८ टक्के लोकांनी अनुकूलता दर्शविली आहे. तर या सर्वेक्षणात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना १३.४० टक्के व नरेंद्र खेडेकर यांना फक्त ३.३५ टक्के मते मिळालेली आहेत. रेखाताई खेडेकर यांना फक्त १.७४ टक्के मते मिळाली आहेत.
चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होईल, असेच राजकीय चिन्हे आहेत. श्वेताताई या भाजप व महायुतीच्या उमेदवार राहतील, तर राहुल बोंद्रे हे काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार राहतील. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील या मतदारसंघातून आपले भवितव्य अजमावू शकतात. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर या मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत आहेत. या चौरंगी लढतीत भाजपच्या उमेदवार फार मोठ्या फरकाने निवडून येईल, असाच निष्कर्ष या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार राहिलेल्या नरेंद्र खेडेकर यांना ६१ हजार १४४ मते मिळाली होती, तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ४४ हजार ५१५ मते मिळाली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत असे चित्र राहणार नाही. या मतदारसंघातून नरेंद्र खेडेकरऐवजी महाआघाडीकडून राहुल बोंद्रे हे उमेदवार निश्चित असून, महायुतीकडून श्वेताताई महाले या उमेदवार राहतील. त्यामुळे खरी लढत ही या दोघांतच होणार आहे.
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, श्वेताताई महाले यांना ४८.९२ म्हणजे जवळपास ४९ टक्के लोकांनी पसंती दिली असून, राहुल बोंद्रे यांना ३०.१८ टक्के लोकांची पसंती आहे. तर नरेंद्र खेडेकर यांना ३.३५ टक्के लोकांची पसंती आहे. बोंद्रे व खेडेकर यांची मते एकत्र केली तरी ती ३३ टक्के इतकी होतात, म्हणजे ती श्वेताताईंइतकी होत नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्वेताताई महाले या राहुल बोंद्रे यांच्यावर मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होतील, असा निष्कर्ष हे सर्वेक्षण काढते आहे.
———