अधिकारी म्हणून काम करताना लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवले तर कारकीर्द यशस्वी होते!
– मिसाळवाडी येथे सेवानिवृत्त जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर नागरी सत्कार सोहळा
चिखली (तालुका प्रतिनिधी) – शासकीय सेवेत अधिकारी पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर शासकीय नोकरीची कारकीर्द यशस्वी होते, असा महत्वपूर्ण सल्ला राज्य सरकारचे अव्वर सचिव तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी शासकीय अधिकार्यांना दिला. तरूणपिढीने जीद्द, कष्ट आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर प्रशासकीय सेवेची संधी निश्चित मिळते, असेही त्यांनी सांगितले. मिसाळवाडी येथे सेवानिवृत्त जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू पाटील हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे, जळगावचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप पाटील भुतेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अनिल अकाळ, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) आशीष वाघ, जानकीदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे पाटील, माजी जिल्हा कोषागार अधिकारी प्रल्हाद ताठे, ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, उद्योजक बळीराम मिसाळ, प्रताप मिसाळ, मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्याधर महाले पाटील म्हणाले, की दिनकरदादांनी कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण व अभ्यासाच्या सहाय्याने जिल्हा कोषागार अधिकारी पदापर्यंत मजल मारली, व आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्यापासून नव्या पिढाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. आजच्या सामाजिक परिकोषात अमूलाग्र बदल झाले असून, समाजाला देणारी माणसे कमी झाली आहेत. अधिकारी पदावर काम करताना समाजाप्रती बांधिलकी जोपासली, आपणदेखील शेतकर्यांचेच पुत्र आहोत याची जाणीव ठेवली, आणि लोकांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले तर आपली कारकीर्द ही यशस्वी होते, तसेच शासनाप्रतीही लोकांच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होते. गेल्या अनेक वर्षानंतर विदर्भाचे चित्र बदलल्याचे दिसत आहे. आपण मागासलेपणाची कात टाकत आहोत, विकासाच्या वाटेवर वेगाने धावत आहोत, कारण राज्याचे नेतृत्व आपल्या मातीतील आहे. विकासाचा हा वेग कायम ठेवायचा असेल, तर आपल्या मातीचा विचार करणारे नेतृत्वच सत्तेवर राहणे गरजेचे असते. एखाद्या अधिकार्याचा सेवानिवृत्तीनंतर त्यांचे गाव एकत्रित येऊन सत्कार करते, यातच त्यांच्या कारकिर्दीची यशस्वीता दिसून येते, असेही याप्रसंगी महाले पाटील यांनी सांगून, दिनकर बावस्कर यांना सामाजिक कार्यात सक्रीय राहण्याची प्रेमळ विनंती करत, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे, जळगावचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप पाटील भुतेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) तथा जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा अनिल अकाळ, जानकीदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे पाटील, माजी जिल्हा कोषागार अधिकारी प्रल्हाद ताठे, ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत, श्री बावस्कर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या, व त्यांना तरूणपिढी घडविणारे सामाजिक कार्य उभे करावे, आपल्या प्रशासकीय ज्ञान व जनसंपर्काचा या नव्या पिढीला फायदा पोहोचून द्यावा, अशी आग्रही सूचना केली.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून प्रास्ताविक स्वराज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ते म्हणाले, की केवळ मिसाळवाडीच नव्हे तर संपूर्ण तरूणपिढीला आदर्श वाटावा असे संघर्षमय जीवन जगून आपल्या शासकीय सेवेची ३१ वर्षे दिनकरकाका बावस्कर यांनी व्यतीत केली आहे. शासकीय नोकरी, कुटुंब, गाव आणि लोकांप्रती कसे वागावे, याचा आदर्श त्यांनी तरूणपिढीला घालवून दिला. त्यांचा हा नागरी सत्कार सोहळा म्हणजे मिसाळवाडी गावाच्या अभिमानाचा क्षण आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच गावातील एक आदर्श व निसर्गप्रेमी जयहरी बाबा मिसाळ यांचे वृक्षाबद्दलचे प्रेमसुद्धा प्रवीण मिसाळ यांनी व्यक्त केले. गावाच्या बसथांबा परिसरामध्ये जी वड, पिंपळ, निंबाची झाडे आहेत, ती सर्व देण ही जयहरी बाबा यांची आहे, अशी विशेष बाब त्यांनी सांगितली.
मिसाळवाडीचे भूमिपुत्र तथा आदर्श शिक्षक असलेले शरद कोलते, संदीप मिसाळ, नीलेश मिसाळ या शिक्षकांनीही याप्रसंगी दिनकर बावस्कर यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारे आपले मनोगत व्यक्त केले. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ विष्णू पाटील गुरूजी, माजी सरपंच देवीदास मिसाळ, पोलिस पाटील रवी मिसाळ, विजय पाटील गुरूजी, मुख्याध्यापक चंद्रभान मिसाळ, संजय बावस्कर सर, संजय भगत, संजय काकडे, शरद कोलते सर, किशोर सुरडकर, अशोक पाटील, भगवान पाटील, सुधाकर पाटील, दामोदर बावस्कर, विद्याताई चंद्रभान मिसाळ, सौ. काकडेताई, सविता अरूण मिसाळ, ग्रामसेविका सौ. भूमिकाताई इंगळे, श्री लोणकर सर व त्यांची सर्व टीम जिल्हा परिषद शाळा मिसाळवाडी, कृषी सहाय्यक मयुरीताई ठेंग यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार उर्मिलाताई संजय बावस्कर यांनी मानले. या सोहळ्याला आलेल्या मान्यवरांनी विदर्भातील प्रसिद्ध मिरची भाजीच्या स्वादिष्ट भोजनाचा लाभ घेतला. हे चवदार भोजन विलास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तयार केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व तरूणांसह ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
———