CrimePune

नवजात बालकांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफास!

– संपर्कासाठी व्हाटसअपचा वापर; दीड वर्षांत अनेक बालकांच्या चोरीचा संशय!

पुणे (वैष्णवी मांडेकर) – पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागात नवजात बाळांची खरेदी विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने या टोळीचा पर्दाफाश करून सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने अनेक बालकांची तस्करी केल्याचा संशय असून, अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शुक्रवारी (दि. १२) काही महिला एका नवजात बालकाची विक्री (तस्करी) करण्यासाठी वाकड येथील जगताप डेअरी परिसरात येणार आहेत. त्यानुसार वाकडच्या तपास पथकाने सापळा रचून कारवाई केली. दुपारी सव्वाचारच्या सुमारास दोन रिक्षांधून काही महिला आल्या. त्यांच्याबाबत संशय आल्याने दोन्ही रिक्षांमधील सहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील नवजात बालकाबाबत विचारणा केली. सहा महिलांनी मिळून त्यांच्यातीलच एका महिलेचे सात दिवसांचे नवजात बालक पाच लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. अटक केलेल्या संशयित महिला अतिशय सराईत असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला. त्यांनी यापूर्वी साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारचे लाखो रुपयांसाठी नवजात पाच बालकांची तस्करी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
या टोळीमध्ये एका परिचारिकेचा सहभाग आहे. ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला असल्याचे तपासात समोर आले आहे. वंध्यत्वाची समस्या असलेले काही दाम्पत्य रुग्णालयात यायचे. याबाबत परिचारिका टोळीतील इतर महिलांना माहिती द्यायची. महिला दाम्पत्याशी संपर्क साधून त्यातील गरजू दाम्पत्यांना पाच ते सात लाख रुपयांमध्ये बाळाची विक्री करायच्या. दोन किंवा जास्त अपत्ये असलेल्या गरीब, गरजू दाम्पत्याला काही रक्कम देऊन त्यांचे नवजात बाळ खरेदी करायचे. त्यानंतर या बाळाची विक्री या टोळीतील महिलांकडून केली जात होती. त्यासाठी रोख स्वरुपात रकमेची देवाणघेवाण होत असल्याचे तपासात समोर आले.


टोळीतील महिला संपर्कासाठी व्हाटसअपचा वापर करायच्या. गेल्या एक ते दीड वर्षांपासून ही टोळी सक्रीय असून, पिंपरी-चिंचवड, पुणे शहरामध्ये त्यांनी नवजात बाळांची खरेदी विक्री केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का, त्यांनी आणखी कुठे बाळांची तस्करी केली आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदु गिरे, रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तुपसुंदर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!