Breaking newsCinemaCrimeHead linesWorld update

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार!

– सलमान खान सुदैवाने बचावल्याची चर्चा; पोलिसांकडून कसून तपास सुरू!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या बांद्रास्थित गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले असून, त्यानंतर ते पळून गेलेत. सलमानच्या घराच्या बालकनी व खिडकीवर या गोळ्या झाडल्या गेल्या असून, सलमान थोडक्यात बचावल्याची परिसरात चर्चा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराची सुरक्षा वाढविली असून, गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तपासाला सुरूवात केली होती. सलमानने जयपूर येथे काळविटाची शिकार केल्यानंतर त्याला बिष्णोई गँगने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. तू न्यायालयातून सुटला तरी, तुझी आमच्याकडून सुटका नाही, अशा स्वरूपाची धमकी देऊन सलमानच्या जीवावर ही गँग उठलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली होती. तसेच, या गोळीबाराकडे पोलिस या धमकीच्या अनुषंगाने पहात आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सलमानच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, लोकांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून, त्यात आरोपी दिसत आहे. त्यांनी चेहरा पूर्णपणे झाकून घेतला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारकडून वायप्लस दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. जून २०२२ मध्ये सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सिद्धू मुसेवालाचे जे हाल झाले होते तेच सलमानचेही होईल असे लिहिले होते. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या १० जणांच्या यादीत खान टॉपवर असल्याचे एनआयएने म्हटले होते.

१९९८ च्या काळवीट शिकारीच्या घटनेबद्दल बिश्नोई समुदाय संतप्त आहे, ज्याचा संदर्भ देऊन लॉरेन्सने एका टीव्ही मुलाखतीत सलमानला मारण्याची धमकी दिली होती. यापूर्वी महाराष्ट्र पोलिस कर्मचारी सलमानसोबत राहायचे, मात्र धमक्या आल्यानंतर त्याला वाय फ्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षा वर्तुळात ११ सैनिक नेहमीच सलमानसोबत राहतात, ज्यात एक किंवा दोन कमांडो आणि २ पीएसओदेखील असतात. यासोबतच सलमानची कारही पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.


पहाटे ४.५५ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सलमान खानच्या घराबाहेर आहे. पोलिस सलमान खानकडून याबाबतची माहिती घेत आहेत. तसेच, सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे. फॉरेन्सिक टीमही याठिकाणी दाखल झालेली आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!