– परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सहदेव लाड यांचे आवाहन
बिबी (ऋषी दंदाले) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची उद्या (दि.13) सकाळी 11 वाजता लोणार येथे प्रचार रॅली व दुपारी तीन वाजता सुलतानपूर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी लोणार शहरातील प्रचार रॅलीला व सुलतानपूर येथील जाहीर सभेला परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे. आपल्या झंजावाती दौर्याने रविकांत तुपकर हे या परिसरातील महौल बदलून टाकणार आहेत.
सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये यावर्षी चौरंगी लढत होणार असून, महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीकडून प्रा. नरेंद्र खेडेकर, वंचित आघाडीकडून वसंतराव मगर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या 22 वर्षापासून पायाला भिंगरी लावून शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने करून शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गुडघे टेकण्यास भाग पाडून शेतकऱ्यांच्या पदरात पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व यासारख्या मदती मिळवून देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हेसुद्धा अपक्ष बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, व गावोगावी तुपकर यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या सभेला सामान्य नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, गावखेड्यातील शेतकरी तुपकर यांना निवडणूक लढण्यासाठी लोकवर्गणीसुद्धा देत आहे. त्याच अनुषंगाने उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता लोणार शहरात भव्य प्रचार रॅली व दुपारी तीन वाजता सुलतानपूर शहरांमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी नेत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.