सिंदखेडराजा (अनिल दराडे) – एकीकडे उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे व महिला अधिकारी धडाकेबाज कारवाया करून वाळूतस्करांचा दणके देत असताना, सिंदखेडराजाचे लाचखोर तहसीलदार सचिन जैस्वालसारखे अधिकारी वाळूतस्करांकडूनच लाचखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. अवैध वाळूतस्करी करताना पकडला गेलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी, तसेच हा ट्रॅक्टर चालू राहण्यासाठी दरमहा ३५ हजारांची लाच मागून, हे पैसे आपल्या वाहन चालकामार्फत स्वीकारताना तहसीलदार जैस्वाल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज (दि.12) दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती. त्याच्यासह त्याचा चालक व शिपाई अशा तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महसूल अधिकार्याच्या लाचखोरीसंदर्भात आजच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोड वृत्त प्रसारित केले होते.
सिंदखेडराजा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले होते. हे रेतीचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तहसीलदार सचिन जैस्वाल याने लाचेची मागणी केली. तसेच, दरमहा 35 हजार रूपये हप्तादेखील मागितला. तक्रारदाराने त्याबाबत बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, हे ट्रॅक्टर सोडण्यासाठी जैस्वाल याने ३५ हजार रुपयांची लाच त्याचा चालक व शिपाई यांच्या माध्यमातून घेतल्याने त्याच्यावर आज कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैस्वाल याचा चालक व शिपाई या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. जैस्वाल याच्या मालमत्तेचीही चौकशी केली जात असून, त्याने काळ्या पैशातून किती माया जमा केली, याचा हिशोब एसीबीचे पथक लावत होते.
तहसीलदार जैस्वालच्या शासकीय निवासस्थानी सापडले रोख ३७.५२ लाख, परभणीतील घरी सापडले ९.४० लाख रूपये रोख
एसीबीने सापळा रचून अटक केल्यानंतर लगेचच तहसीलदार जैस्वाल याच्या शासकीय निवासस्थानी झडती घेण्यात आली असता, त्याच्या घरी ३७ लाख ५२ हजार १८० रूपये रोख स्वरूपात सापडले, तर त्याचवेळी परभणी येथील एसीबीच्या पथकाने त्याच्या परभणीतील घरीदेखील झडती घेण्यात आली असता, तेथे ९ लाख ४० हजार रूपये रोख सापडले. या रकमा एसीबीने जप्त केल्या असून, जैस्वाल याच्या इतरही मालमत्तांचा शोध घेतला जात आहे.
असा सापडला लाचखोर जैस्वाल जाळ्यात
अवैध वाळूच्या वाहतुकीत पडकला गेलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी तसेच दरमहा हप्ता देण्यासाठी तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल (वय ४३) याने तक्रारदाराकडे ३५ हजार रूपयांची मागणी केली होती. दरमहा ३५ हजार रूपये हप्ता देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबी, बुलढाणाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचला. जैस्वाल याचा वाहनचालक मंगेश शालीग्राम कुलथे यांच्याकडे फिर्यादीने ३५ हजार रूपये तहसीलदार जैस्वालला देण्यासाठी दिले व ते त्याने स्वीकारले. तसेच, ही लाच देण्यासाठी शिपाई पंजाबराव तेजराव साठे यानेही प्रोत्साहन दिले व आजच लाच देण्याचे सांगितले. आरोपी मंगेश कुलथे (चालक) याने तक्रारदाराकडून ३५ हजार रूपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या लाच प्रकरणातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई सापळा अधिकारी सचिन इंगळे, मदत पथकातील कर्मचारी गजानन शेळके आदींनी पार पाडली.