– पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूउपसा सुरूच!
चिखली (कैलास आंधळे) – सर्व सामान्य नागरिकांनी बांधकामासाठी अवघ्या ६०० रूपये ब्रासने रेती देऊ ही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली घोषणा व त्यादृष्टीने केलेली प्रशासकीय कार्यवाही निव्वळ लॉलीपॉप व सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक ठरली आहे. लोकांना ही स्वस्तातील रेती मिळतच नसून, रेतीडेपोदेखील कुठे सुरू झालेले नाहीत. या उलट पूर्णानदीसह सर्वच नदीपात्रांतून खुलेआम वाळूउपसा सुरू असून, प्रशासकीय यंत्रणांतील काहींचे रेतीमाफियांशी साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे. अवैध रेतीउपसा व रेतीतस्करीमुळे सद्या रेतीचे भाव गगनाला भिडले असून, बांधकाम करणे हे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यापलिकडे गेलेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेतीच्या वाहतुकीवर कारवाई चालू होत असतानाच, अनेक छोट्यामार्गाने अवैध रेतीची सर्रास वाहतूक होत आहे. एकीकडे महसूल विभागातील काही प्रामाणिक अधिकार्यांनी कारवाई करायच्या, आणि दुसरीकडे काही अधिकार्यांनी ही रेतीतस्करीची वाहतूक चालू ठेवायची हे धोरण प्रशासकीय यंत्रणांतील काही अधिकार्यांचे दिसून येत आहे. राज्य शासनाने अनेक गोरगरिबांचे घरकुल चालू असताना सहाशे रुपये ब्रासने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप एकालाही ही सहाशे रुपये ब्रासने रेती मिळालीच नाही. ज्या नागरिकांचे घरकुल अपुरे आहे त्यांना रेतीचे भाव सध्या गगनाला भिडल्यामुळे त्यांचे घरकुल अजूनसुद्धा पूर्ण होऊ शकलेले नाही. बुलढाणा जिल्ह्यात देऊळगावमही जवळील असलेल्या पूर्णा नदी पात्रातून संपूर्ण जिल्ह्यात रेतीची वाहतूक होत असताना महामार्गावर, तसेच ग्रामीण मार्गावरून अवैधरेतीचे टिप्पर सर्रास चालू असल्याचे दिसून येत आहे. तरीसुद्धा संबंधित विभागाची या बाबीकडे डोळेझाक दिसून येत आहे. एकीकडे काही प्रामाणिक अधिकार्यांनी रेतीचे टिप्पर पकडायचे तर दुसरीकडे काही अधिकार्यांनी अवैध रेतीची वाहतूक चालू ठेवायची, यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहे. अवैध रेती वाहतुकीमध्ये वरची कमाई करणारे अधिकारी कोण, हा सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.