Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesKhamgaonMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

“कोणी किती बी ताना, निवडून येणार पाना!”

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची तालुक्यातील देऊळघाट येथे काल रमजान ईदच्या पर्वावर रात्री अभूतपूर्व जाहीरसभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने तालुक्यातील मुस्लीम व हिंदू बांधवांची उपस्थिती होती. या निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत मुस्लीम युवकांनी “कोणी किती बी ताना, निवडून येणार पाना..” ही घोषणा दिल्याने जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचा कौल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, शिवसेना (ठाकरे) पक्ष व महायुतीचे प्रा. नरेंद्र खेडेकर व वंचित आघाडीचे वसंतराव (मामा) मगर हे उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी जाधव व खेडेकर हे कट्टर हिंदुत्ववादी असून, यांचा पूर्वेतिहास मुस्लीम समाजाला माहिती आहे. तर वसंतराव मगर यांना मत म्हणजे, भाजप निवडून येण्याचा धोका!, अशी धारणा मुस्लीम समाजाची झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास अडिच ते तीन लाख मुस्लीमांची मते ही रविकांत तुपकर यांनाच मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

रमजान ईदच्या पर्वावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देऊळघाट व धाड येथे जोरदार सभा घेतल्या. या सभांना हिंदू व मुस्लीम धर्मियांनी चांगलीच गर्दी केली होती. काही मुस्लीम नेत्यांनी खासगीत तुपकरांच्या भेटी घेऊन त्यांना मुस्लीम समाजाचा कौल सांगितला. आपण खासदार झालोत तर जिल्ह्यातील धार्मिक सलोखा कायम राखू. आपण जात-धर्म न पाहाता, विकासाचे राजकारण करू. शेगाव येथे विमानतळ, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, खामगाव येथील एमआयडीसींचा विकास, नवीन उद्योग-धंदे व प्रकल्प आणून तरूणपिढीच्या हाताला रोजगार देणे, व्यापार व उद्योगांसाठी पोषण वातावरण निर्माण करणे, माझ्यासारखा माणूस संसदेत जाणे गरजेचे असून, शेतकरी, व्यापारी, मजुरांच्या प्रश्नांवर आज कुणीही तोंड उघडत नसल्याने संसदेत मी एकटा सरकारला धारेवर धरून या उपेक्षित-वंचित घटकांचे प्रश्न मार्गी लावू शकतो. आज मी कोणत्याच पदावर नसताना हे सरकार हालवू शकतो, खासदार झालो तर काय काय करता येईल?, याचा विचार तुम्हीच करा, अशा शब्दांत तुपकरांनी आपली भावना यानिमित्त झालेल्या सभांतून व्यक्त केल्यात.


राजकीय ध्रुवीकरणात बुलढाण्याचा खासदार मुस्लीम व दलित मतदार ठरविणार!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांच्यामुळे चौरंगी लढत होत आहे. या चौरंगी लढतीतील तीन प्रमुख उमेदवार हे पूर्वीचे शिवसैनिक आहेत. त्यातील मावळते खासदार प्रतापराव जाधव व प्रा. नरेंद्र खेडेकर हे शिंदे व ठाकरेंच्या ‘शिवसेने’कडूनच लढत आहेत. तर वसंतरावमामा मगर हे वंचित आघाडीकडून उभे आहेत. या तीनही मतदारांत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणार आहे. मागील निवडणुकींचा इतिहास पाहाता, ‘वंचित आघाडीला मत म्हणजे भाजपला फायदा’ असे राज्यभरातच दिसून आल्याने यावेळेस सावध झालेला दलित व मुस्लीम मतदार वंचित आघाडीला मतदान करेलच, याची शाश्वती वाटत नाही, तशा मानसिकतेत तो नसल्याचे जाणवते आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात १८ लाख २२ हजार ९५२ इतके मतदान आहे. दर पंचवार्षिकला साधारणपणे ५६ ते ५८ टक्के मतदान होत असते. यावेळेस चुरस असल्याने ६० ते ६५ टक्के मतदान होण्याचा प्रशासकीय अंदाज आहे. त्यामुळे दलित समाजाचे ३ लाख ४४ हजार ५३८ (१८.९० टक्के), अनुसूचित जातीचे (एसटी) ८५ हजार ६७९ व मुस्लीम समाजाचे २ लाख ११ हजार ६३३ (११.६० टक्के) म्हणजे दलित, आदिवासी व मुस्लीम मिळून जवळपास ३५ टक्क्यांच्या आसपास मतदार आहेत. हिंदू व ओबीसी, मराठा मतांच्या ध्रुवीकरणात हे मतदारच बुलढाण्याचा खासदार ठरवणार आहेत. या विविध जातीघटकांतून सद्या तरी रविकांत तुपकर यांच्याबद्दलच अनुकूल मतप्रवाह दिसून येत आहे. खासदार म्हणून निवडून येण्यासाठी यंदा तीन ते साडेतीन लाख मते असली तरी चालेल, असाही प्रशासकीय अंदाज असल्याने ‘तुपकरांचे यंदा नशीब जोरात’ असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा खरी होताना दिसत आहे.


सिंदखेडराजा-देऊळगावराजा, चिखली, व खामगाव-शेगावमधून तुपकरांना मिळेल ‘लीड’?

महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर व महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या लढतीत हिंदुत्ववादी, मराठा व ओबीसी मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होईल, व त्याचा फायदा रविकांत तुपकरांना होईल, असा एक मतप्रवाह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे. रविकांत तुपकर हे तरूण व आक्रमक नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे शेतकरी व शेतकर्‍यांच्या तरुण पोरांची मोठी ताकद जिल्ह्यात आहे. ही तरूणपिढी चिवटपणे तुपकरांचा प्रचार करताना दिसत आहे. या शिवाय, तुपकर हे लोकसभेत गेले तर अनेकांचा ‘सुंठी वाचून खोकला जाणार’ आहे. कारण, तुपकर हे लोकसभेत गेले नाही तर ते विधानसभेला उभे राहतील. त्यासाठी त्यांच्याकडे बुलढाणा, चिखली व सिंदखेडराजा-देऊळगावराजा तीन मतदारसंघ आहेत. व या मतदारसंघात शेतकरी चळवळीची ताकद मोठी आहे. त्यामुळे भाजपच्या ‘मुंबई व दिल्लीतील चाणक्यांनी’ कितीही ‘प्रेशर’ केले व कितीही कार्यक्रम लादले तरी या तीन मतदारसंघातून रविकांत तुपकरांना ‘लीड’ मिळणे निश्चित असल्याचे राजकीय धुरिणांचे मत आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या सहा मतदारसंघात सद्या महायुतीचे आमदार आहेत. तर, सहकारी संस्था, ग्रामपंचायती, बाजार समित्यादेखील याच नेत्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदार व नेत्याला कुणी किती ‘लीड’ द्यायचा आहे, कोष्टकच भाजपच्या मुंबई व दिल्लीतील चाणक्यांनी आखून दिलेले आहे. परंतु, मुरब्बी राजकारणी असलेले महायुतीचे हे शिलेदार खरोखर हे कोष्टक पाळतील की नाही? याची गॅरंटी देता येणार नाही. कारण, प्रत्येकजण आपआपल्या मतदारसंघातील राजकीय गणिते पाहून निर्णय घेणार असून, तुपकरांना लोकसभेत पाठवले नाही तर तीव्र महत्वांकांक्षी असलेले तुपकर विधानसभेच्या निवडणुकीत छाताडावर बसतील, अशी भीती या शिलेदारांना वाटते आहे. त्यादृष्टीने बाहेरून महायुतीच्या उमेदवाराला ‘लीड’ देऊ, असे हे शिलेदार सांगत असले तरी, ‘आतून खेळ’ करून मोकळे होणार आहेत, असेही राजकीय धुरिणांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठी आहे. खालच्या पातळीवरील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व बुलढाण्यातील एक नाराज नेता, रविकांत तुपकरांसोबतची आपली ‘दोस्ती’ निभावत असल्याचेही खासगीत सांगण्यात आलेले आहे. या निभावलेल्या ‘दोस्ती’ची परतफेड रविकांत तुपकर हे विधानसभेच्या निवडणुकीत करतील, अशी या नेत्याला पुरेपूर खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!