मेहकर (तालुका प्रतिनिधी) – हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमात दरवर्षी श्रीरामनवमीला प. पू. शुकदास महाराज समाधी सोहळयाचे आयोजन केल्या जाते. यावर्षी दि. १५, १६ ,१७ एप्रिल रोजी या सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरिद्री नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे व शिवभावे जीवसेवा करणे हा माझा परमार्थ व माझे जीवनध्येय आहे. या विचारांनी जीवनभर मानवसेवा करणारे प. पू. शुकदास महाराज ४ एप्रील २०१७ रोजी ब्रह्मलीन झाले होते. त्यांनी स्थापन केलेला विवेकानंद आश्रम अध्यात्मासह आधुनिक विज्ञान, आरोग्य, कृषि तंत्रज्ञान, ग्रामविकास या व्दारे निरपेक्ष सेवेचा मार्ग अनुसरून आहे. आत्मोन्नती साधतांना मानवी जगण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने व व्यापकतेने पाहण्याचा दृष्टीकोन हे विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्याचे वैशिष्ट्ये राहिलेले आहे. दि. १५ ते १७ एप्रिल या तिनही दिवशी श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ भैरवगड वारी हनुमान यांच्या अमृतवाणीतून भाविकांना कथेचा लाभ घेता येणार आहे. दररोज दोन कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, अनुभूती गायन होणार आहे. हभप राजेंद्र महाराज निंबेकर आळंदी, रामेश्वर महाराज बंड जालना, हभप विष्णु महाराज साठे आळंदी, प्रकाश महाराज जवंजाळ चिखली, गजाननदादा शास्त्री महाराज जालना यांची कीर्तने होणार आहेत. हभप विष्णु थुट्टे महाराज, निवृत्तीनाथ येवले महाराज यांची प्रवचने संपन्न होतील. शेवटच्या दिवशी सकाळी मंत्रघोष, ग्रामप्रभात फेरी, सकाळी ९ वा. समाधीस्थळावर विधीवत अभिषेक पूजन होईल. शेतीची कामे आटोपली असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात कार्यक्रमासाठी व कथेसाठी गर्दी करणार आहे. त्यादृष्टीने संस्थेची तयारी अंतीम टप्यात असल्याचे आश्रम सूत्रानी सांगितले.
श्रीराम कथेसाठी भव्य सभामंडप
उन्हाची तीव्रता लक्षात घेता कार्यक्रमासाठी ५० फुट उंचीचा सभामंडप टाकणे सुरू असून १८०० चौरस फुटाच्या जागेत भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पावसाची शक्यता लक्षात घेता वाटरप्रुप मंडप टाकला आहे.
भाविकांसाठी भोजन,निवासाची सोय
विवेकानंद आश्रमात संपन्न होणाऱ्या प.पू.शुकदास महाराजांच्या समाधी सोहळयानिमित्त्त विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर श्रीराम कथा,कीर्तन,प्रवचन,शाहिरी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवास, भोजन व आरोच्या शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे.