– वीज पडून माणसे, जनावरे दगावली, शेतीपिकांसह फळबागा, भाजीपाल्यांचेही नुकसान!
नागपूर/छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) – विदर्भ व मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपिटीने मोठा तडाखा दिला असून, जनावरे, घरेदारे, शेतीपिकांची मोठी हानी झाली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासकीय यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी, प्रशासकीय यंत्रणा सद्या निवडणुकीच्या कामात असल्याने हे पंचनामे वेळेवर होतात, की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या गारपिटीने शेतीपिकांसह भाजीपाला, आंबा व फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. हवामान विभागाने राज्यात कोकण भाग वगळता, इतर भागात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला असून, या भागातल्या जिल्ह्याना येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतकर्याच्या तोंडचा घास हिरावला. सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे. सुमारे ३५ हजार ३८९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळबागांना पाऊस-गारपिटीचा तडाखा बसला. अकोला जिल्ह्यातील ७४ गावांमधील चार हजार ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान पातुर तालुक्यात झाले. बुलढाणा जिल्ह्यात १०० गावांतील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. काल रात्री सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांनाही मोठा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यातील अडीचशेवर गावांतील दोन हजार हेक्टरवरील पिकांना पावसाने तडाखा दिला. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी-सावळी मार्गावर वीटभट्टीवर काम करणार्या मजूर महिलेचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. वीज कोसळून दोन बैलही दगावले. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील छपरे उडाली तर पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात सुमारे ५५ घरांचे नुकसान झाले. बुलढाणा जिल्ह्यात सुमारे तीनशेहून अधिक घरांची पडझड झाली. वीज पडून व झाडाखाली दबून १३ जनावरे दगावली. संग्रामपूर तालुक्यात वीज पडून तीन जण गंभीर जखमी झाले.
विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी पिकांची मोठी हानी झाली असून, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्येही गुरुवारी गारांच्या मार्याने नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भात यापूर्वी सहा ते नऊ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र नव्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात १३ एप्रिलपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीची दाट शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका!
बीड शहरासह जिल्ह्यातल्या धारूर, अंबाजोगाई यासह विविध भागांना काल व आज गारपिटीसह जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर इतका होता की नदी नाल्यांना पूर आला असून, यामुळे भाजीपाला आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्यासह पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यातल्या इळेगाव येथे एका ६५ वर्षीय शेतकर्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातल्या बहुतांश भागातही संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार, लिंगेवाडी, दावतपूर भागात गारांचा पाऊस झाल्याने, फळबागांना फटका बसला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वादळी वार्यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.