BULDHANAKhamgaonVidharbha

मत म्हणजे केवळ कागद किंवा बटन नव्हे; मात्र हे समजून घेण्यासाठी नागरिकांमधे वैधानिक जागृती आवश्यक – एड.डॉ. विजयकुमार कस्तुरे

बुलढाणा/नांदुरा (संजय निकाळजे) – फुले – आंबेडकर जयंती २०२४ निमित्ताने नांदुरा, जि. बुलढाणा येथील जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा ही काळाची गरज – या विषयावर ०९ एप्रिल ते १४ एप्रिल, २०२४ रोजी स्थानिक नालंदा नगर येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या पहिल्या पुष्पात नागरी जीवनामधे कायद्याचे महत्त्व व परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर उकलण करीत असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यास्तव अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी, मत म्हणजे केवळ कागद किंवा बटन नव्हे, मात्र हे समजून घेण्यासाठी नागरिकांमधे वैधानिक जागृती आवश्यक असल्याचे विधान केले. तसेच भारतीय संविधानानुसार देशाच्या प्रत्येक नागरिकास देशातील सर्व कायद्यांची माहिती असणे अनिवार्य असून, कायद्याची माहिती नसण्याला न्यायालयात क्षमा नाही, तसेच हे लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे बनविलेले सरकार असल्याने शासन प्रशासनाच्या केंद्रस्थानी लोक म्हणजे या देशाचा प्रत्येक नागरिक असल्याचे सांगून त्यामुळेच दैनंदिन जीवनात आवश्यक ते कायदे जुजुबी स्वरूपात का होईना पण जाणून घेणे कसे गरजेचे आहे, हे विषद केले. सरकार तथा जन प्रतिनिधींना जनहितार्थ प्रश्न विचारण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी मतदानाचा हक्क निरपेक्ष आणि मुक्त पणे विचारपूर्वक बजावला पाहिजे, असेही ते म्हणालेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्मान टी. जी.तायडे यांनी तर समर्थ सूत्र संचालन इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्मान भारत साळवे यांनी केले. याप्रसंगी सोहळ्यातील विशेष अतिथी म्हणून नागसेन बुद्ध विहार संस्था, चिखलीचे सचिव तथा अंतर्राष्ट्रीय समाज भूषण डॉ.डी.व्ही.खरात सर आणि मानवाधिकार ऑथॉरिटीच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष तथा अंतर्राष्ट्रीय पर्यावरणच्या पदाधिकारी आयुष्मती शीतल शेगोकार, शेगाव यांचा, त्यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी विविध संस्थांतर्फे पुरस्कृत करण्यात आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. तसेच फुले – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी गायक आयुष्मान नारायणराव डोंगरदिवे यांनी आपल्या सुंदर गीतगायनाद्वारे प्रबोधन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आयुष्मान भीमराव तायडे यानीही मोलाचे मार्गदर्शन केले. तर आयुष्मान पी. डी. सरदार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्थापन तसेच पोलीस विभागाचे अभिनंदनीय सहकार्य लाभले. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!