बिबी (ऋषी दंदाले) – येथील संत सेवालाल महाराज चौकातील सेवाध्वजासह लोखंडी पोल अज्ञात समाजकंटकाने तोडून नेल्यामुळे बंजारा समाजात संतापाची लाट पसरली असून, याबाबत बिबी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या समाजकंटकाचा कसून शोध घेत आहेत.
किनगावजट्टू रोडवर सेवालाल चौक म्हणून पाटी लावलेली आहे. त्याचबरोबर सेवालाल महाराजांचा एक झेंडासुद्धा मागील पंधरा ते वीस वर्षापासून तिथे लोखंडी पाईपमध्ये उभारलेला आहे. दरम्यान, २६ जानेवारीच्या रात्री अज्ञात इसामाने सदरील झेंडा तोडून नेला असल्याचे समाजातील काही व्यक्तींच्या लक्षात येताच, बिबीसह परिसरातील बंजारा समाजबांधव सेवालाल चौक येथे जमा झाले. सदर झेंडा म्हणजे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक वर्षी इथे समाजाकडून पूजाअर्चा करण्यात येते. १५ फेब्रुवारीरोजी संत सेवालाल महाराजांची जयंती येत असून, ती जयंती येथे साजरी होऊ नये, या हेतूने अज्ञात समाजकंटकाने मागासवर्गीय विमुक्त भटक्या समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांचा ध्वज (झेंडा) तोडून नेला. त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. सदर अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी. जर कारवाई न झाल्यास येत्या ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारची तक्रार बंजारा समाज बांधवाकडून बिबी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
या तक्रारीची दखल घेऊन लगेच बिबी पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन बास्टेवाड यांनी ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवालाल महाराज चौक येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला. लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे बिबी पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर बंजारा समाजबांधवाकडून त्या ठिकाणी सेवाध्वजाची विधीवत पूजा करून उभारणा करण्यात आली.