बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील हत्ता येथील शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून केलेल्या कालच्या कारवाईत आज अखेर ट्रॅक्टर भरून गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारातील किंमत एक कोटी ४० लाख आहे. विदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली असून, बुलढाणा जिल्ह्यात गांजाची सर्रास विक्री होत असल्याची बाब या कारवाईने उघड झाली आहे. तब्बल १४ क्विंटल गांजा जप्त झाला असून, काल दुपारपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी गांजा लागवड करणारा शेतकरी अनिल चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोणार तालुक्यातील हत्ता येथे मोठ्या प्रमाणात गांजाची शेती होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे व हेकॉ. दीपक वायाळ यांना मिळाली होती. या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन लोणार हद्दीत पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतात धाड टाकली होती. समोरचे दृश्य पाहून पोलिसांना धक्काच बसला. चक्क शिवारभर गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ संबंधित शेती मालकाला ताब्यात घेतले आणि गांजीची रोपे शेतातून काढून ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आली. चक्क गांजाने ट्रॉली भरली होती, १४ क्विंटल गांजा यावेळी जप्त करण्यात आला असून, ज्याची अंदाजे किंमत १.४० कोटी आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिली. काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेली कारवाई सायंकाळी सहा वाजता संपली. आरोपी शेतकरी अनिल चव्हाण याला पोलिसानी ताब्यात घेतले असून, अमली पदार्थ विरोधी आणि औषधी पदार्थ कायदा कलम २० अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता, १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
लोणार येथील ठाणेदार मेहेत्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या कारवाई पथकात एलसीबीचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सपोनि नंदकिशोर काळे, सपोनि नीलेश सोळंके, पोउपनि सचिन कानडे, Hc शरद गिरी, Hc दीपक लेकुरवाळे, Hc राजकुमार राजपुत, Hc दिनेश बकले, NPC गणेश पाटील, NPC पुरुषोत्तम आघाव, NPC गजानन दराडे, Pc अमोल शेजोल, Pc वैभव मगर, Pc मनोज खराडे, Pc दीपक वायाळ, Lpc वनिता शिंगणे, HC शिवानंद मुंडे, चालक pc विलास भोसले आदींचा समावेश होता.