– मुख्याधिकारी डोईफोडे हा नगर जिल्ह्यातील तर शेळके मोताळा तालुक्यातील रहिवासी
जळगाव जामोद (तालुका प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारात सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे आणि नगरपरिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके या दोघांना तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषदेतच्या आवारातच रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, आरोपी मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून, आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे. शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनी ही लाच मागितली होती.
लाचखोर अधिकार्यांना लाच देण्याची तक्रारदाराची मानसिकता नसल्यामुळे या संबंधीची तक्रार संबंधित ठेकेदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे (वय ३२) आणि नगरपरिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (वय ३०) या दोघांना तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषदेतच रंगेहात पकडले. ही कारवाई पो.उपअधीक्षक श्रीमती शीतल घोगरे, पो.नि. सचिन इंगळे, महेश पथक स.फौ. शाम भांगे, पो.हे.कॉ. विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पो. ना. जगदीश पवार,विनोद लोखंडे, पो.कॉ. शैलेश सोनवणे, म.पो.कॉ. स्वाती वाणी आणि चालक पो.ना. नितीन शेटे, पो.कॉ. अरशद शेख सर्व ला.प्र.वि बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे. त्यांना मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र आणि देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.