१७ तारखेपर्यंत पीकविम्याची रक्कम द्या, किंवा पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल करा, अन्यथा ठिय्या आंदोलन
– लोणार तालुका कृषी विभागाकडून पीकविमा कंपनीची पाठराखण – सहदेव लाड यांचा आरोप
बिबी (ऋषी दंदाले) – यावर्षी खरीप हंगामामध्ये कोरडा दुष्काळ पडल्यामुळे शेतकर्यांच्या सोयाबीन, कापूस पिकांच्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट झाली. शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने लोणार तालुका दुष्काळ जाहीर करूनसुद्धा एकाही शेतकर्याला पीकविमा कंपनीच्यावतीने एक रुपयाही पीकविम्याची रक्कम देण्यात आली नाहा.r तरी या शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम देण्याची किंवा विमा कंपनी पिक विम्याची रक्कम देण्यास विलंब करीत असल्यास विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सहदेव लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे लोणार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती, परंतु तालुका कृषी अधिकार्यांनी काहीही कारवाई केली नाही. तालुका कृषी अधिकारी हे पीकविमा कंपनीची पाठराखण करत आहेत का, असा संतप्त सवाल करत आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केला आहे. १७ डिसेंबरपर्यंत पीकविम्याची रक्कम द्या, किंवा कंपनीवर गुन्हा दाखल करा, अन्यथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशाराही लाड यांनी दिला आहे.
सहदेव लाड म्हणाले, की यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकावर येलो मोझाक रोग आल्यामुळे ज्या लोणार तालुक्यातील शेतकर्यांनी मोबाईलवर ऑनलाइन येलो मोजाकची तक्रार केलेली आहे, तसेच कपाशीवर लाल्या रोग आल्यामुळे सोयाबीनला शेंगा व कपाशीला जास्त बोंडे लागली नाही, कोरड्या दुष्काळामुळे शेतकर्यांच्या सोयाबीन व कपाशी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्यावर बसला आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री यांनी दिवाळीपूर्वी शेतकर्यांना खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम देऊ असे सांगितले होते. परंतु दिवाळीला एक महिना उलटूनही लोणार तालुक्यातील एकाही शेतकर्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने लोणार तालुका खरीप हंगामामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर होऊनही पीक विमा कंपनीने शेतकर्यांना एक रुपयाही पिक विमा दिला नाही.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिनांक ४ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे लोणार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे येत्या १७ डिसेंबरपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम टाकण्याचे आदेश कंपनीला देण्याची किंवा पिक विमा कंपनी पिक विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्यास विमा कंपनीवर लोणार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु, या निवेदनाचे उत्तर म्हणून लोणार तालुका कृषी विभागाने एका लेखी पत्राद्वारे कळविले की, जेव्हा पिक विमा कंपनी विमा मंजूर करेल तेव्हा शेतकर्यांना विमा मिळेल. त्यामुळे आपण पिक विमा संबंधी कृषी कार्यालयासमोर कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये, असेसुद्धा पत्रात नमूद करण्यात आले. या पत्राच्या माध्यमातून लोणार तालुका कृषी विभाग हा पिक विमा कंपनीला पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. तरी येत्या १७ डिसेंबरपर्यंत लोणार तालुक्यातील शेतकर्यांना पिक विमा न मिळाल्यास किंवा पिक विमा कंपनीवर लोणार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल न केल्यास लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करणार व जोपर्यंत शेतकर्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आपण लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे सहदेव लाड यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे.