आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदीतील धार्मिक महत्त्व लक्षात घेत यावर्षी रमा एकादशी दिनी वसुबारस आल्याने गोवत्स पूजन आणि एकादशी विविध धार्मिक उपक्रमांनी परंपरांचे पालन करीत साजरी करण्यात आली. माउली मंदिरात श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करीत वसुबारस देखील साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.
माऊली मंदिरात रमा एकादशी, वसुबारस विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली. माऊली मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी केली होती. दर्शनास भाविकांनी पहाटे पासून गर्दी करून दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परंपरांचे धार्मिक कार्यक्रम आणि पहाटे दिवाळी पहाट हा संगीत मेजवानी देणारा उपक्रम आळंदी देवस्थानचे वतीने सुरु झाला असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. दिवाळी मधील पहिला दिवस वसूबारस हा सण आपल्याला निसर्गाशी जोडून घेण्याचा सण आहे. वसुबारस अंतर्गत गोवत्स पूजन करीत आळंदी परिसरात दिवाळीस उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवसी वसूबारस म्हणजे गाई व तीचे वासरू यांची पुजा करण्याचा दिवस होय. गाई ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. पंच महाभूते यांचा समन्वय करून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचे कार्य गाई करते, शेतीसाठी लागणारे सर्व खते, औषधे, मानवास उत्तम आहार गाई देते. यामुळे या गाईंचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्त्व ओळखून आळंदीतील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, आळंदी शहर भाजप तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश गरुड यांचे संकल्पनेतून परिसरात विविध ठिकाणी गोवत्स पूजा उत्साहात करण्यात आली. गाई वाचली तरच निसर्ग वाचणार आहे, निसर्ग वाचला तरच आपण राहणार आहोत, यामुळे आपले जीवन वाचविण्यास व आनंदी जीवनासाठी गाई आपल्यात आवश्यक आहे. यामुळे वसुबारस दिनी गाईची पुजा मोठ्या उत्साहात करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीत गाई वाचविण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. गाई तुमचे जीवन आनंदाने, समाधानाने भरून टाकील. निसर्ग भरभरून देईल. यासाठी जनजागृती करण्यात आली. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे यांचे मार्गदर्शनात गोवत्स पूजन उत्साहात झाले.
आळंदी पंचक्रोशीत ठीकठिकाणी गोवत्स पूजनास आवाहन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीत गोपूजन महत्त्वाचे मानले जाते. गो मातेच्या कृतज्ञते साठी वसुबारस निमित्त गोवत्स पूजन करण्यात आले. आळंदी शहर आणि पंचक्रोशीत अनेक ठिकाणी गोवत्स पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरूड यांनी सांगितले. शहरात ठिकठिकाणी गो पूजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक, महिलांनी तसेच गो पूजकाने या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन गरुड यांनी केले होते. आळंदी परिसरातील सार्वजनिक मठ,मंदिरे,चौक परिसरात सामाजिक कार्यकर्ते, गोपालक, आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली होती. नागरीकांनी येऊन गोवत्स पूजा करण्याचे आवाहन गणेश गरूड यांनी केले होते. या प्रथा परंपरां जोपासण्याचे कार्यात गोभक्त, गोपालक, गोरक्षक यांनी सहभाग घेतल्याचे गणेश गरुड यांनी सांगितले.
भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, संजय घुंडरे, सागर बोरुंदीया, पांडुरंग वहीले, सचिन गिलबिले, सागर भोसले, दिनेश घुले, संतोष गावडे, भागवत आवटे, बंडूनाना काळे, वासुदेव तुर्की, चारुदत्त प्रसादे, संकेत वाघमारे, ज्ञानेश्वर बनसोडे, भागवत काटकर, संगिता फपाळ, आनंद वडगावकर, विकास पाचुंदे, शिवानंदन पाटील, प्रथमेश होले आदींनी गोवत्स पूजनास नियोजन केले.