Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

गुरूविरूद्ध शिष्यानेच थोपाटले दंड!; लोकसभेच्या मैदानात जिल्ह्यात तिसरा भिडू!

– रविकांत तुपकर, संदीप शेळके यांच्यानंतर संजय गायकवाड लोकसभेच्या आखाड्यात?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात अमरावती पॅटर्न राबवून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याबाबत सकारात्मक गोपनीय हालचाली चालविल्या असतानाच, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात त्यांची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. आ. गायकवाड हे सद्या शिंदे गटात असून, या गटाचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. लोकसभेसाठी प्रतापराव पुन्हा इच्छुक आहेत. परंतु, आ. गायकवाड या त्यांच्याच शिष्याने दंड थोपाटल्याने त्यांची चांगलीच राजकीय गोची होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. दरम्यान, लोकसभेसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची एल्गार रथयात्रा जिल्ह्यात सुरू असून, तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तर शाहू परिवाराचे प्रमुख संदीप शेळके यांनीही परिवर्तन यात्रा काढून चाचपणी केली आहे. या दोघांमध्ये आ. गायकवाडांच्या रूपाने तिसरा भिडू लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत असल्याने आगामी निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

विशेष बाब अशी की, बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर खुद्द भारतीय जनता पक्षाचाच डोळा आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील निवडणूक प्रमुखाची जबाबदारी भाजपने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे दिली आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत व त्यांच्यातील व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील छुपा संघर्ष बुलढाणेकरांसाठी नवा नाही. खासदार प्रतापरावांच्याच आग्रहामुळे २०१९च्या निवडणुकीत विजयराज शिंदे यांची शिवसेनेची उमेदवारी गेली होती. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गट अर्थात खासदार प्रतापराव जाधव व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड या दोघांची भाजपसोबत जवळीकता वाढली. परिणामी, माजी आमदार विजयराज शिंदे यांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. असे असतानाही निवडणूक प्रमुखपदाची वर्णी लागल्यामुळे विजयराज शिंदे हेच लोकसभेचे उमेदवार राहतील, असे त्यांचे समर्थक म्हणू लागले असतानाच आता आ. गायकवाडांच्या भूमिकेमुळे शिंदे यांचीही राजकीय कोंडी झाली आहे.
वास्तविक पाहाता, सन १९९६ पासून शिवसेनेचा गड असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा ‘मिशन -४५’मध्ये समावेश करून भाजपाने शिंदे गटाला वर्षभरापूर्वीच धक्का दिला होता. सुरुवातीला याला गांभीर्याने न घेणार्‍या शिंदे गटाला नंतर मात्र दखल घेणे भाग पडले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व रावसाहेब दानवे यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली गेली आहे. या दोघांनी मागील सुमारे १० महिन्यांत सहावेळा मतदारसंघाचा आढावा घेत, अगदी बूथ पातळीवर पक्ष मजबूत करणे चालवले आहे. तसेच, लोकसभेसाठी भाजपनेते, पदाधिकारी व कार्यकर्त्याना ‘चार्ज’ करून ठेवले आहे. त्यामुळे आता आ. संजय गायकवाड यांनीदेखील लोकसभेची तयारी चालविल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. तथापि, ऐनवेळी ते अमरावती पॅटर्न राबवून रविकांत तुपकरांना लोकसभेवर संधी मिळवून देऊ शकतात. शिवाय, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसदेखील त्यासाठी अनुकूल आहे. परंतु, आ. गायकवाडांच्या भूमिकेमुळे बुलढाण्याच्या राजकारणात मजेशीर ट्वीस्ट निर्माण झाला आहे. आ. गायकवाडांनी लोकसभेचे संकेत देऊन त्यांचे शिवसेनेतील राजकीय गुरू खासदार प्रतापराव जाधवांनाच धक्का दिला नाही तर जिल्ह्यातील राजकीय समिकरणेदेखील मोडीत काढली आहेत. लोकसभेच्या आखाड्यात रविकांत तुपकर, संदीप शेळके यांच्यानंतर आता तिसरा भिडू उतरला आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!