बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची एल्गार रथयात्रा चौथ्या दिवशी (दि.८) मेहकर-लोणार तालुक्यात पोहोचली. मेहकर तालुक्यातील जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड, गोहगाव दांदडे, डोणगाव, खंडाळा, अंत्री देशमुख, चिंचोली बोरे तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर, रांजणी, जांबूल, मांडवा या गावांमध्ये या रथयात्रेचे अतिशय उत्साहाने ग्रामस्थांनी आणि शेतकर्यांनी स्वागत केले. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन तुपकरांनी यावेळी दिले.
या प्रसंगी शेतकरीवर्गाने सोयाबीन कापूस पीकविम्या संबंधात असलेल्या समस्या रविकांत तुपकरांना सांगितल्या. त्यावर तुपकरांनी शेतकर्यांना २० तारखेला बुलढाणा येथे होणार्या महामोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की आपण सरकारला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सळो की पळो करू व शेतकर्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्वतोपरी सोडण्याचा प्रयत्न करू. शेतकर्याच्या सोयाबीन व कापसाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासनदेखील रविकांत तुपकरांनी दिले. दि.२० नोव्हेंबरचा एल्गार महामोर्चा हा आपल्या हक्कासाठी असल्याने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होवून शेतकरी, शेतमजूर, महिला व तरूणांची ही लढाई निकराने लढूया, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. तुपकरांच्या लढ्यासाठी याप्रसंगी शेतकरीवर्गाने त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढण्याची ग्वाही दिली.