लोणार (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पळसखेड येथील राजाराम गजानन जायभाये यांच्या खुनाचा उलगडा करण्यात लोणार पोलिसांना अखेर यश आले असून, प्रेयसीसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने जायभाये यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपी संतोष थोरवे (रा़ पळसखेड) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे.
सविस्तर असे, राजाराम गजानन जायभाये असे मृतकाचे नाव आहे. जायभाये हे २८ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेत वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी लोणार पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. अशातच राजाराम जायभाये यांचा मृतदेह २९ ऑक्टोबररोजी शेतात आढळला होता. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे व पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोढे, विशाल धोंडगे, नितीन खरडे संतोष चव्हाण, भाऊसाहेब मोरे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करून व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवली व घटनास्थळी पोलिसांच्या सोबतच सुगावा घेण्यासाठी उभा असलेला आरोपी संतोष थोरवे, रा. पळसखेड याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.