– भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व राष्ट्रवादीच्या मंदाकिनीताई खड़से यांची भेट!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यात दि. २९ ऑक्टोबरपासून खामगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने स्थानिक टॉवर चौकात आमरण व साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे, तर आज, दि. ३० ऑक्टोबररोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मलकापूर येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली. दरम्यान, आज ३० ऑक्टोबररोजी खामगाव येथील उपोषण मंड़पाला भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदाकिनीताई एकनाथ खड़से यांनी भेट देवून पाठिंबा दर्शविला आहे.
राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी जि. जालना येथे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यात वाढता पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यातील खामगाव येथेही टॉवर चौकात आंदोलनाला पाठिंबा म्हणून काल, २९ ऑक्टोबरपासून प्रवीण कदम, शंकर खराड़े, शिवाजी जाधव, संतोष येवले, कड़ूचंद घाड़गेसह अनेक समाज बांधवांनी आमरण व साखळी उपोषणास सुरूवात केली आहे. दरम्यान, आज, ३० ऑक्टोबररोजी भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदाकिनी एकनाथ खड़से यांनी उपोषण मंड़पाला भेट देत पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश माने, अवताड़े, देवेंद्र देशमुख, देऊळगाव साकरशाचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत देशमुख यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी आज साखळी उपोषणात सहभाग नोदवला.
दरम्यान, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मलकापूर येथेही सकल मराठा समाजाच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येवून साखळी उपोषणासदेखील सुरूवात करण्यात आली. यामध्ये अनेक समाज बांधव सहभाग झाले होते.