Breaking newsHead linesMarathwada

बीडमध्ये आ. क्षीरसागरांचे घर जाळले, आ. सोळंकेंचे घर, माजलगाव नगरपरिषदेची इमारतही पेटवली

– बीड शहर परिसरात संचारबंदी लागू!

जालना/बीड (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आंदोलनाला आज (दि.३०) बीड जिल्ह्यात चांगलेच हिंसक वळण लागले. तसेच, राज्यातही अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्यात. आमदार प्रकाश सोळंके यांचे घर आणि माजलगाव नगरपरिषदेची इमारत पेटवण्यात आली असतानाच, सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इमारतीलाही आग लावण्यात आला होती. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बीडमध्ये संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना, बीड व लातूर व परभणी जिल्ह्यातील आणखी चौघा तरुणांनी रविवारी आत्महत्या केली. यापूर्वी १९ ते २८ आॅक्टोबरदरम्यान १२ जणांनी आत्महत्या केली हाेती. त्यामुळे बळींची संख्या १६ झाली आहे. अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथे अजय रमेश गायकवाड (२७) या तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेतला. गोवर्धन हिवरा (ता. परळी)येथे गंगाभिषण रामराव मोरे (३३) या तरुणाने गळफास घेतला. तिसऱ्या घटनेत लातूर जिल्ह्यातील गोंद्री (ता.औसा) येथे शरद वसंत भोसले (३२), तर परभणी जिल्ह्यात बोर्डी येथे बापूराव उत्तमराम मुळे (४०) यांनी गळफास घेतला.

https://twitter.com/i/status/1719014782492352516

बीड जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटकच्या परिघातील हद्दीपर्यंत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले आहे. आज सकाळी आमदार प्रकाश साळुंखे यांचे घर व गाड्या जाळल्याची घटना घडली. तर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नगर रोडवरील बंगला पेटवण्यात आला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच बीडमधील राष्ट्रवादीचे कार्यालयदेखील जाळण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली होती.
दरम्यान, जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. बीडमध्ये सुरू असलेल्या जाळपोळीबद्दल त्यांनी मत व्यक्त केले. जाळपोळ उद्रेक कोण करत आहे ही शंका आहे, असे ते म्हणाले. आज रात्री, उद्या सकाळी जाळपोळ करू नका, नेत्यांच्या घरी जाऊ नका, अशा सूचना त्यांनी दिल्या. असे केले नाही तर मी वेगळा निर्णय घेईन, असा इशारा त्यांनी दिला. हिंसक घटना करणारे सत्ताधार्‍यांचे कार्यकर्ते असण्याची शक्यता आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलकांना हिंसक घटना बंद करण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.


जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस होता. त्यांची प्रकृती ढासळली आहे. यावेळेस पाण्याचाही त्यांनी त्याग केला आहे. दोनवेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला. शिवाय, ते डॉक्टरांना उपचारही करु देत नाहीत. त्यामुळे जरांगेंना बोलण्यातही अडचणी येत आहेत. आज माध्यमांशी संवाद साधण्यासाठी उठत असताना ते जागेवर कोसळले. आधार देऊन त्यांना बसवण्यात आले. यामुळे त्यांनी पाणी प्यायलंच पाहिजे यासाठी तेथे उपस्थित असलेले मराठा बांधव आक्रमक झाले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांना उपचारांची खूपच गरज आहे. पाच ते सहा दिवस झाले त्यांच्या पोटात पाणीदेखील नाही. त्यामुळे डिहायड्रेशन खूप झाले आहे. त्यांना खूपच वीकनेस आला आहे. बीपी आणि शुगरही कमी झाले असल्याची शक्यता आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!