बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी साडेतीन हजाराची लाच घेणार्या पोलिस कर्मचारी व सफाई कामगारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने काल (दि.२९) रोजी रात्री रंगेहाथ अटक केली आहे. काल रात्रीच याप्रकरणी उशीरा गुन्हे दाखल झाले होते. या कारवाईने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की बिबी पोलिस स्टेशनअंतर्गत तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या निकालावर प्रलंबित आहेत. न्यायालयाने तक्रारदार व त्यांचे आई-वडील, तसेच इतर नातेवाइकांविरुद्ध जमानती वारंट काढला होता. बिबी पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानबा राजाराम सोसे याने तक्रारदार यांना तुम्हाला व तुमच्या आई-वडील आणि इतर नातवोइकांना अटक न करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती सोसे याने बिबीचे सफाई कामगार विजय फकिरा उबाळे याच्यामार्फत ३ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात शीतल घोगरे, पोलिस उपअधीक्षक एसीबी बुलढाणा व त्यांच्या पथकाने केली. दोन्ही आरोपींविरुद्ध बिबी पोलिस स्टेशनमध्ये २९ ऑक्टोबर रोजी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.