आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची राजगुरूनगर येथे शुक्रवारी ( दि. २० ) मराठा आरक्षणाचे मागणीसह जनजागृती आणि सकल मराठा समाज बांधवांचे समवेत सुसंवादासाठी जाहीर सभा होत आहे. या सभेच्या जनजागृतीसाठी आळंदीत सकल मराठा समाज बांधवानी दुचाकी रॅली काढून सभेस जनजागृती करीत मराठा आरक्षणाचे मागणीस जोरदार घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली.
दुचाकी रॅलीत आळंदीतील विविध सेवाभावी संस्थासह सकल मराठा समाज सहभागी झाला होता. जोरदार घोषणा देत दुचाकी रॅली उत्साहात झाली. आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था येथील चौकातून दुचाकी रॅली चाकण चौक, प्रदक्षिणा मार्गे, नगरपरिषद चौक, छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळा स्मारक येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करीत जुन्या दगडी पुलावरून देहू फाटा मार्गे परत चाकण चौक नगरप्रदक्षिणा मार्गे समारोपास श्री भैरवनाथ चौक येथे जोरदार घोषणा देत आली. यावेळी भैरवनाथ चौकात समारोपात २० ऑक्टोबर २०२३ खेड येथील सभेची माहिती देण्यात आली. येथे संजय महाराज हिवराळे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, भागवत शेजूळ यांनी मार्गदर्शन केले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे प्रमुख उपस्थितीत रॅली शांततेत पार पडली. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांचे मार्गदर्शनात सुरळीत वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. रॅलीचे नियोजन सकल मराठा समाज आळंदी पंचक्रोशीचे वतीने समाज बांधवानी उत्साहात केले. वारकरी शिक्षण संस्थेचे समोरील चौकातून नगरप्रदक्षिणा मार्ग रॅलीचा भैरवनाथ चौकात समारोप पसायदानाने झाला. यावेळी रॅली व समारोपात एक मराठा – लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, कोण म्हणते देत नाय – घेतल्या शिवाय रहात नाय, जय शिवाजी – जय भवानी, चलो राजगुरूनगर अशा जोरदार घोषणा देत दुचाकी रॅलीची उत्साहात सांगता झाली. राजगुरूनगर येथील सभेस जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.