Breaking newsChikhaliCrimeHead linesVidharbha

चंदनपूर हत्याकांडाला धक्कादायक वळण; हिंदुत्ववादी संघटनांना ‘लव्ह जिहाद’चा संशय

– मानवीतस्करीशी संबंधित प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय; कसून तपास सुरू!
– आरोपींकडे बोगस आधारकार्ड व कागदपत्रे, एक तर एका मुलीचा बाप निघाला!

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील चंदनपूर येथील परप्रांतीय मुलीच्या खुनाच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, हे प्रकरण मानवीतस्करी किंवा लव्ह जिहादशी संबंधीत असल्याचे निदर्शनास येत आहे. पीडित मुलीचे आई-वडिल चिखली येथे आल्यानंतर अनेक बाबींचे धक्कादायक खुलासे झाले असून, अंढेरा पोलिसांनी आपली तपासाची दिशा बदलली आहे. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह पश्चिम बंगाल येथे नेणे शक्य नसल्याने तिच्या पार्थिवावर चिखली येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. ही मुलगी पश्चिम बंगालमधून ज्या मुलासोबत पळून आली होती, तो मुलगा गायब असून, तिच्यासोबत राहणारे संशयीत आरोपी हे वेगळेच असल्याने व त्यांची कागदपत्रे बनावत असल्याने या प्रकरणाची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दरम्यान, काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणावर लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला असून, काल चिखली येथे निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. चिखलीच्या आ. श्वेताताई महाले यांनीदेखील जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून सखोल तपासाची मागणी केली आहे.
चंदनपूर येथील मुलीच्या हत्येप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील यांनी सुतावरून स्वर्ग गाठत अवघ्या १२ तासांत आरोपी जेरबंद केले होते. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच आरोपी फरार होऊ शकले नाही, व या धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा होऊ शकला. अंढेरा पोलिसांनी केलेल्या तपासात, मृत मुलगी अंजली उर्फ मिस्ट्री ही एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमधील कुमारगंज पोलिस ठाणे हद्दीतून बेपत्ता झालेली असून, तशी नोंद या पोलिस ठाण्यात आहे. परंतु, तेथील पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. ती ज्या मुलाबरोबर पळून गेली होती, तो मुलगादेखील तिला सोडून गेला असून, ती हत्याकांडातील आरोपी जाकीर उर्फ छोटू व अलीमोद्दीन मिया उर्फ रजत उर्फ राहुल यांच्या संपर्कात आली. या दोघांनीच तिला पुण्यातून चंदनपूर येथे आणले होते. तथापि, तिचा खून का केला, याचा उलगडा अद्याप होऊ शकला नसून, या आरोपींना १४ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळालेली असून, पोलिस कसून तपास करत आहेत. यातील मुख्य आरोपी जाकीर हा विवाहित असून, त्याला तीन वर्षाची मुलगी आहे. या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
या मुलीचे आई-वडिल आज (दि.१९) चिखली येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीचा मृतदेह ओळखला, व एकच हंबरडा फोडला. मृतदेह खराब झालेला असल्याने चिखली येथेच त्यावर आई-वडिलांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंढेरा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली असून, हे प्रकरण मानवीतस्करीशी संबंधित आहे, का या अनुषंगाने अधिक माहिती घेतली जात आहे.

सकल हिंदू समाज आक्रमक, चिखली तहसीलवर काढला मोर्चा

सकल हिंदू समाजाने याप्रकरणी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. हा “लव्ह जिहाद”चा धक्कादायक प्रकार असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला असून ठाणेदार विकास पाटील यांनी प्रकरणाचा तपास करतांना हलगर्जी केल्याचा आरोप केला आहे. ठाणेदारांनी घटनास्थळाचा पंचनामा करतांना व्हिडिओ चित्रीकरण केले नाही. पोस्टमार्टम करण्याची घाई केली, प्रकरण गंभीर असताना देखील ठाणेदारांनी ओन कॅमेरा पोस्टमार्टम का केले नाहीत, असा सवाल सकल हिंदू समाजाने उपस्थित केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ १८ ऑक्टोबरला चिखलीत सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला, यावेळी सरकारला, प्रशासनाला तहसीलदारांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ठाणेदारांवर कठोर कारवाई करा, या घटनेचा पुन्हा एकदा सखोल तपास करा अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभे करू, असा इशारा हिंदू जागरण मंचाचे विभाग संयोजक हेमंत पिल्ले यांनी दिला. मोर्चात आमदार श्वेता महाले यांच्यासह भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, दुर्गा पूजा वाहिनी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी देखील निवेदन देतेवेळी उपस्थित होत्या. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने दिलेले निवेदन स्विकारले असून, जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचवण्यात येईल. या घटनेच्या तपासात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या दूर करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!