आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासह श्री गणेश मूर्ती दान स्वीकारण्यास आळंदी नगरपरिषदे तर्फे ६ आणि आळंदी शहर शिवसेनेचे वतीने २ अशी ८ श्री गणेश विसर्जन कुंड विकसित करण्यात आली आहेत. अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांचे वतीने येथील चाकण चौक वाहनतळ, वैतागेश्वर मंदिर विश्वरूप दर्शन मंच मुख्य रस्त्या लगत अशा दोन ठिकाणी श्री गणेश मूर्ती दान व श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंड ठेवण्यात येत असल्याचे शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्याचे उपाय योजने अंतर्गत श्री आळंदी धामसेवा समिती व शिवसेना आळंदी शहर यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर श्री गणेश विसर्जन कुंड भाजी मंडई तसेच विसर्जन कुंड वैतागेश्वर मंदिर जवळील मुख्य रस्त्या लगत ठेवण्यात येत आहेत. यासाठी सुमारे पाच हजार लिटर क्षमतेची ही दोन कुंडे तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी श्रींचे विसर्जन वेदमंत्र जयघोषात आरती नंतर विसर्जन करून श्रींची मूर्ती दान स्वरूपात घेतली जाणार आहे. या सर्व मूर्ती दान आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वीकारून योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाणारआहे. यासाठी प्रभावी दक्षता घेतली जाणार असल्याचे श्री आळंदी सेवा धाम समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले. यासाठी शास्त्र युक्त पद्धतीने देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पूजा करण्यात येऊन उपक्रमास सुरुवात करणार आहे. यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पाच हजार लिटर क्षमतेची दोन विसर्जन कुंड तसेच एक पाण्याचा टँकर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी राहुल चव्हाण, सचिन शिंदे, रुपेश लोखंडे, संकेत वाघमारे, नितीन ननवरे, साईनाथ ताम्हाणे, ज्ञानेश्वर शेखर आदी उपस्थित होते. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या वतीने बांधकाम अभयंता संजय गिरमे यांनी विसर्जन कुंड विकसित करण्या बाबतचे निवेदन स्वीकारले.
आळंदीत लक्षवेधी देखाव्यात आकर्षक सजावट; गणेशभक्तांची देखावे पाहण्यास गर्दी
आळंदी येथील सार्वजनिक गणेशोत्सव देखाव्यामध्ये विविध ठिकाणी आकर्षक लक्षवेधी सामाजिक बांधिलकीतून सादर केलेले देखावे पाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे. आळंदी शहरातील गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करीत लक्षवेधी देखावे साकारले आहेत. विविध देखाव्यात राजे ग्रॉऊंपचे वतीने मुलींवरील भ्याड हल्ला हा हालत देखावा सादर करीत समाज प्रबोधनाचे कार्य करीत भाविकांची दाद मिळवली. याच बरोबर रक्तदान शिबीर घेऊन १९१ रक्तदात्यांनी उत्साहात रक्तदान शिबीर यशस्वी केले. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विनोद पगडे, बाळासाहेब मुलगीर, सागर जगताप. ज्ञानेश्वर काळकर, पांडुरंग चौधरी आदी उत्सवात परिश्रम घेत आहेत. न्यू दत्तनगर ग्रुप तर्फे आकाश मंदिर प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधत आहे. माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे यांचे मार्गदर्शनात मंडळ कार्यरत आहे. जय गणेश प्रतिष्ठानने महाकाल मंदिराची आकर्षक निर्मिती सादर केली आहे. गोविंद कुऱ्हाडे मंडळाचे अध्यक्ष म्हंणून कार्यरत आहेत. उमेश कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शनात दत्त नगर मित्र मंडळाने मंदिराची लक्षवेधी प्रतिकृती सादर करीत भाविकांची दाद मिळवली. जया भवानी मित्र मंडळाने सती सावित्री हा हलता पौराणिक देखावा सादर करून धार्मिक परंपरांचे पालन करीत उत्सव साजरा करीत आहेत. मंडळाचे अध्यक्ष सागर टिंगरे, गणेश वहिले उत्सवाचे यशस्वीतेस परिश्रम घेत आहेत. जय गणेश मित्र मंडळाने श्री नामदेव पायरी मंदिर प्रतिकृती श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर देवदर्शन देखावा तयार केला असून भाविक, नागरिकांची दर्शनास गर्दी होत आहे. माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शनात मंदिर वाटचाल करीत आहे. गुरुदेव मित्र मंडळाने बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा लक्षवेधी बनविला आहे. मंडळाचे प्रमुख पद्माकर तापकीर यांचे नेतृत्वात मंडळाने यावर्षीचा लक्षवेधी देखावा सादर करून भाविकांची दाद मिळवली. येथील श्री आळंदी धाम सेवा समिती व शिसेना आळंदी शहर यांचे वतीने सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले असून यास उत्साही प्रतिसाद मिळाल्याचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले. सात मंडळांना लवकर पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रेयानी केले होते. यास मंडळांनी तसेच नागरिकांनी प्रतिसाद दिला.