भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आरतीला आले; गणेश मंडळाचा मांडव पेटला!
– पोलिस प्रशासनासह कार्यकर्त्यांचीही उडाली धावपळ
– भाजपला आगामी निवडणुकीसाठी अपशकुन घडल्याची रंगली चर्चा!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुण्यातील एका गणेश मंडळात मोठा अनर्थ होण्यापासून टळला. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मंडळाच्या कळसाला अचानक आग लागली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आरतीला आलेले असताना ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिस प्रशासनासह मंडळाच्या कार्यकर्त्यांचीही एकच धावपळ उडाली. दरम्यान, गणेश मंडळाच्या कळसाला आगीची ही घटना भाजपसाठी आगामी निवडणुकांकरिता मोठा अपशकुन घडला असल्याची चर्चा पुण्यात खमंगपणे रंगली होती.
#WATCH | Pune, Maharashtra: Sane Guruji Tarun Mitra Mandal catches fire.
Details awaited. pic.twitter.com/N27zSpLi7Q
— ANI (@ANI) September 26, 2023
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आले होते. येथे महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंदिराच्या कळसाला अचानक आग लागली आणि मंडळ पदाधिकार्यांची आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आग लागल्याने नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. तितक्यात पाऊस सुरु झाल्याने मंडपाला लागलेली आग विझली आणि मोठी दुर्घटना टळली, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुण्यातील गणपती दर्शनासाठी राजकीय नेत्यांची मांदियाळी होत असते. त्यानिमित्ताने नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या मंडळांनाही भेटी देतात आणि त्याच्या भेटीसाठी कार्यकर्ते जल्लोषाचे वातावरण तयार करण्यासाठी फटाके तसेच मोठे आतषबाजी करत असतात. असाच प्रसंग आज धीरज घाटे यांच्या मंडळात घडला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंडळात आरतीसाठी गेले असताना त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ते करत असताना एक फटाका हा मांडवाच्या कळसाला लागला. यामुळे त्या कळसाने पेट घ्यायला सुरुवात केली. यामुळे आग लागल्याची घटना घडली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अचानक आग लागल्याने नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. दरम्यान, ही घटना म्हणजे भाजपसाठी अपशकुन असल्याचीही चर्चा पुण्यात खमंगपणे रंगली होती.