अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी धनगर समाज उपोषणाच्या पवित्र्यात!
लोणार (उद्धव आटोळे) – अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच असून, इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘ड’ ऐवजी ‘र’ असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही, त्यामुळे ही चूक दुरूस्त करण्यात यावी, धनगर समाजाला (एसटी) अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणी करिता महाराष्ट्रभर आंदोलने सुरू असताना, मेहकर येथे उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा लोणार व मेहकर येथील धनगर समाज बांधवांनी दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज आपल्या हक्कासाठी आंदोलन व उपोषणाच्या पवित्र्यात आहे. धनगर समाजावर झालेला हा अन्याय अजून किती दिवस सहन करायचा, असा प्रश्न धनगर समाज बांधवांनी सरकारला केला आहे. राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असतानासुद्धा आरक्षणाची अंमलबजावणी केव्हा होणार, यासाठी धनगर समाज आता सरकार विरोधात आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबताना दिसत आहे.
मेहकर व लोणार येथील धनगर समाज बांधवांनी ३० सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास १ ऑक्टोंबरपासून उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी गजानन बोरकर, शिवाजी ढवळे, प्रा.विठ्ठल गिलवरकर, अॅड.रामेश्वर शेवाळे, पत्रकार उद्धव आटोळे, धनु रोंदाळे, राजू खोरणे, नवनीत सोनाळकर, देविदास कष्टे, एकनाथ खराट, अनिल ढवळे, दीपक गुलमोहर, भागवत आटोळे, प्रल्हाद गोरे, राजेश चौरे, अनुराग रैदळे, दीपक बनसोडे, संदीप टाल, विष्णू साखरे, विनोद साखरे, आनंद साखरे, गजानन गायकवाड, गोविंद इवरे, भास्कर सोळुंके, रामप्रसाद खोडवे, गजानन पातळे यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.