भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.सुनील तोताराम कायंदे
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या दृष्टीने मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील ओबीसी चेहरा म्हणून ओळख असणारे डॉक्टर सुनील तोताराम कायंदे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष संजय गजानन गाते यांनी नियुक्ती केली आहे.
भारतीय जनता पक्ष केंद्रासह राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे ३० वर्षापासून कायंदे परिवाराच्या भोवती राजकारण फिरत आहे. माजी आमदार तोताराम कायंदे यांनी दहा वर्षे मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तर दुसरीकडे डॉक्टर सुनील कायंदे यांनीदेखील दसरा मेळावा कृती समितीच्या माध्यमातून तसेच मतदारसंघातील ओबीसी समाजाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल अखेर पक्षाने घेतली असून, त्यांची ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची निवड ही आगामी लोकसभा व विधानसभा तथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. आपल्या निवडीचे श्रेय डॉक्टर सुनील कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, आमदार संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रभारी डॉक्टर आशीष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे, सचिन देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील स्थानिक भाजपच्या नेत्यांना दिले आहे.
पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवू – डॉ. सुनील कायंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भाजप नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्याचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वश्रेष्ठ असून, त्यांच्या कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. येणार्या काळात सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी चोख पार पाडण्याचा प्रयत्न करू, व पक्षाच्या माध्यमातून ओबीसी समाजाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आपल्या निवडीप्रसंगी डॉक्टर सुनील कायंदे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
विधानसभेसाठी भाजपकडून नव्या दमाचा उच्चशिक्षीत चेहरा?
डॉ. सुनील कायंदे हे भाजपचा सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातील आश्वासक चेहरा आहे. कायंदे यांचा व्यापक जनसंपर्क आणि वंजारी व मराठा समाजात असलेली लोकप्रियता पाहाता, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रमोद केले गेले असावे, अशी राजकीय चर्चा तालुक्यात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कायंदे-शिंगणे अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ही लढत ऐतिहासिक राजकीय गेमचेंजर ठरेल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. सद्या या मतदारसंघात शिंदे गटातून माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची संभाव्य लढत मानली जात आहे. परंतु, भाजपचे Winning Candidate (विनिंग वँâडिडेट) म्हणून भाजपकडून डॉ. सुनील खेडेकर यांच्याकडे बघितले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने आतापासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली असल्याचे स्पष्ट होत आहे.
————