दुसरबीड ग्रामपंचायतीत ‘अविश्वासा’चे ढग दाटले; राष्ट्रवादीतील दोन गटांत सत्तेसाठी लाथाळ्या!
– आ. राजेंद्र शिंगणे दुसरबीड ग्रामपंचायतीतील दुफळी मिटवणार का?; शिंदे गटाचीही भूमिका ठरणार निर्णायक!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्या दुसरबीड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाली असून, सत्तेसाठी नेत्यांमध्येच लाथाळ्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह या भागाचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासाठीदेखील चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. सद्या दोन्ही गटाचे सदस्य सहलीवर पळवून नेण्यात आले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ असून, गावाची लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा मानणारे सरपंच आहेत. असे असताना क्षुल्लक कारणावरून नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून दिनांक २२ सप्टेंबररोजी मध्यरात्री सत्ताधारी एका गटाने ९ सदस्य तर दुसर्या गटाने ५ सदस्य सहलीवर नेल्याच्या चर्चेला पेव फुटले आहेत.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा मतदारसंघाचे दुसरबीड हे मध्यस्थान असून, राजकारणाचा केंद्र बिंदू आहे. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच ठिकाणावरुन सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होतात. अशा या दुसरबीड ग्रामपंचायतीवर माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर विश्वास ठेवून गावाच्या विकासासाठी येथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे ग्रामपंचायतीची सत्ता सोपावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ पैकी १३ सदस्य निवडून आलेले असून, पाच वर्षाकरिता या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता दिलेली आहे. मात्र विकासाऐवजी येथे नेत्यांच्या, मी मोठा का, तो मोठा, या एकमेकांच्या इगो व सत्तास्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाव पुढार्यांमधे मतभेद होऊन टोकाला पोहोचले व अखेर परिणामी दोन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये माजी सभापती विलासराव देशमुख व माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान अली शेख यांचा एक गट तर दुसरा जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंदारे यांचा व संदीप देशमुख यांचा एक गट पडला आहे.
इरफान अली शेख विलासराव देशमुख यांच्या गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ ग्रामपंचायत सदस्य सहलीवर गेलेले आहेत. तर दुसर्या गटासोबत पाच सदस्य गेल्याची चर्चा गावात सुरू आहे. विलासराव देशमुख व इरफान अली यांच्या गटाला शिंदे गटाच्या दोन सदस्यांचे समर्थन असल्याचेही बोलले जात आहे, तर विद्यमान सरपंच सौ. ज्योती प्रकाश सांगळे यांनी आपल्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. परंतु या सत्तासंघर्षामध्ये विरोधी गटामध्ये असलेल्या चार शिंदे गटाच्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकार बोलत आहे. तसेच आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यावर काय भूमिका घेतात? की दोन्ही गटाचा सत्तासंघर्ष मोडीत काढतात? किंवा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन अविश्वास ठराव जिंकतील काय? याकडे गावकर्यांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
————–