सांगली (संकेतराज बने) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या सचिवालयात विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बाळसिंग राजपूत यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राजपूत यांनी महाराष्ट्र सायबरचे पहिले पोलीस अधीक्षक म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली होती.
सातारा जिल्ह्यातील औंध हे बाळसिंग राजपूत यांचे मूळ जन्मस्थान आहे. बाळसिंग राजपूत हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून दाखल झाले होते. सांगली, गडचिरोली, सोलापूर, महाराष्ट्र सायबर, मुंबई पोलीस या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली असून, महाराष्ट्रात पहिल्यांदा स्थापन केलेल्या सायबर युनिटचे अधीक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या मुंबई पोलीस दलात गुन्हे प्रकटीकरणाचे उपायुक्त म्हणून ते कार्यरत आहेत.
बाळसिंग राजपूत हे एम टेक, पीएच.डी. आणि महाराष्ट्र राज्य पोलीसमध्ये कार्यरत आहेत. ते पोलीस अधिकारी, वक्ता आणि संशोधक आहेत. सायबरसुरक्षा क्षेत्रात त्यांच्याकडे धोरणात्मक आणि तांत्रिक कौशल्य आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी 51 सायबर लॅब आणि 43 सायबर पोलीस स्टेशन बांधण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.