– महाराष्ट्रभरातून कवी, गायक, प्रबोधनकार यांची होती उपस्थिती
अकोला (संजय निकाळजे) – महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती अकोला जिल्ह्याच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील पांढरदेव येथील रहिवासी तथा आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनकार गजाननदादा गवई यांना जीवन गौरव पुरस्कार गुरूवारी (दि.३१) अकोला येथील एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जिल्हा अकोलाच्या वतीने राज्यस्तरीय सर्वधर्म समभाव महाकवी वामनदादा कर्डक यांचा १०१ वा ऐतिहासिक जयंती महोत्सव ३१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टॅन्ड अकोला या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते प्राध्यापक डॉ संतोष हुसे हे होते तर माजी डेप्युटी मॅनेजर आरसीएफचे ज्ञानदेव खंडारे हे उद्घाटक म्हणून तर विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, काँग्रेस नेते अभय पाटील, महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, गायक तथा स्वागत अध्यक्ष राजेश शिरसाठ, मार्गदर्शक मुख्याध्यापक संजय तायडे, कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज खंडारे, गायिका रीता खंडारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या पांढरदेव येथील प्रबोधनकार गजाननदादा गवई यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात औरंगाबाद येथील प्रसिद्ध कवी गायक प्रबोधनकार प्रा डॉ किशोर वाघ त्यांचे ‘पुकारे तुम्हा मिलिंद चे घरटे निळे निळे…या ज्ञान पाखरांनो चला नागसेन वनाकडे’..हे गाणे लयभारी ठरले. यावेळी महाराष्ट्रभरातून सुप्रसिद्ध कवी गायक यांची उपस्थित होती.
गेल्या वीस वर्षापासून गजाननदादा गवई हे कला क्षेत्रामध्ये कार्यरत असून सुप्रसिद्ध कवी- गायक प्रबोधनकार राहुलदादा अनविकर यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रसह इतर राज्यात सुद्धा महापुरुषांची विचारधारा गायनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून रुजवलेली आहे. त्यामुळेच त्यांची निवड या पुरस्कारासाठी झाली. या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक प्रबोधनकार प्राध्यापक किशोर वाघ औरंगाबाद, सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात औरंगाबाद, मंजुषा शिंदे पुणे, आकाश राजा गोसावी यवतमाळ, विकास राजा नागपूर, गायिका प्रबोधिनी साठे वर्धा,कुणाल बोदळे मुक्ताईनगर, सपना खरात अकोला, दिपाली इंगळे अमरावती, राहुल कांबळे कारंजा, विजय मांडकेकर मांडका, गायक – पत्रकार संजय निकाळजे, गायक संदीप साळवे चिखली- बुलढाणा यांच्यासह महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून कवी, गायक ,प्रबोधनकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.