निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींच्या सानिध्यात ज्यांना जीवनाचे ध्येय गवसले असे माझ्यासह जे अनेक तरूण होते, त्यात संतोष श्रीकृष्ण थोरहाते या तरूणाचादेखील समावेश होता. युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर दृढ श्रद्धा आणि पू. शुकदास माऊलींच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्याची तळमळ म्हणून हा युवक विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यात उतरला. विवेकानंद आश्रमाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काची जबाबदारी सांभाळताना त्याला पत्रकारितेचे व्यापक विश्व खुणवू लागले, आणि तो राज्यातील आघाडीचे दैनिक सकाळचा स्थानिक बातमीदार झाला. शेतकरी, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या समस्यांना त्याने ‘सकाळ’च्या माध्यमातून वाचा फोडली. संवेदनशील पत्रकारिता आणि तितकेच संवेदनशील व्यक्तिमत्व यामुळे तो अल्पावधीत हिवरा आश्रमसह संपूर्ण तालुक्यात लोकप्रिय पत्रकार म्हणून नावारूपाला आला. पत्रकारिता करताना कुणाचे मन दुखवले जाणार नाही, याची काळजी जशी त्याने घेतली, तसेच काहीप्रसंगी तो कठोरपणेही वागला, व सत्याची बाजू उचलून धरत त्याने समाजविघातक प्रवृत्तींना आपल्या धारदार लेखणीद्वारे समाजासमोर नागडेही केले. शेतकरी, बहुजन समाज आणि परिसर विकास या अंगाने त्याची पत्रकारिता सातत्याने प्रवाहित होत गेली. विकासाच्या मुद्द्यावर त्याने केवळ बातमीच लिहिली नाही तर राज्यकर्ते व प्रशासनाला दिशा दाखविण्याचे कामही केले. एक संवेदनशील पत्रकार ते संपादक आणि ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ग्रूपचा सहअध्यक्ष ही त्याची गरूडझेप निश्चितच कौतुकास्पद राहिली आहे.
संतोष थोरहाते हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ते उत्कृष्ट योगशिक्षक आणि प्रसारक आहेत. विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासोबतच त्यांनी योगज्ञानाचे धडे देण्याचे अविरत व्रतदेखील स्वीकारले आहे. पाण्यावर योगासने करण्याची त्यांची उद्भूत हातोटी तर वाखाणण्याजोगी आहे. ही कला पूर्वी पू. शुकदास महाराजश्रींना अवगत होती. ती संतोष थोरहाते यांनी अवगत केली, हेही महाराजश्रींचे आशीर्वादच म्हणायला हवे. गेली अनेक वर्षे ते ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ परिवाराशी जुळलेले आहेत. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे ते सहअध्यक्ष म्हणून कार्यरत असून, या मीडिया ग्रूपचे टेव्निâकल आणि नेटवर्कचे कामकाज ते पाहतात. यासह त्यांनी ‘निर्भीड सारथी’ हे साप्ताहिक काढले असून, या साप्ताहिकाचे ते मुख्य संपादकदेखील आहेत. एकूणच एकाचवेळी अनेक क्षेत्रात कार्यरत असलेला हा माझा मित्र प्रचंड ऊर्जावान असून, व्यापक जनसंपर्क व व्यासंग लाभलेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असतं, ‘जे स्वतःसाठी जगतात ते जगूनही काही फायदा नाही. परंतु, जे दुसर्यासाठी जगतात तेच खर्याअर्थाने जगत असतात, मृत्यूनंतरही ते नावारुपाने जीवंत राहतात. अमरत्व म्हणजे मोक्ष नाही. जीवसेवेच्या माध्यमातून शिवाची सेवा करणे, आणि ही सेवा करता करता शिवस्वरूपच होऊन जाणे म्हणजे मोक्ष’. माझ्या या मित्राला आध्यात्माची जाण असून, म्हणून विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्याला तो मोक्षाचे साधन असेच समजतो. आश्रमात येणार्या प्रत्येकाचे हसून स्वागत करण्यापासून ते पीडित, उपेक्षितांच्या वेदनांवर फुंकर घालण्यापर्यंत त्याचे काम सुरू असते.
मित्र म्हणून ज्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे, अशा या माझ्या जीवलग मित्राचा आज वाढदिवस. यानिमित्त त्याचे अभीष्टचिंतन करतानाच, त्याला जनसेवेसाठी उंदड आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे.
पुरूषोत्तम सांगळे
मुख्य संपादक, ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप, मुंबई
अध्यक्ष महाराष्ट्र ईव्ही डील्स प्रा. लि. पुणे
—————-