मेहकर (अनिल मंजुळकर) – रक्षाबंधन हा भारतातील लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असे म्हणतात. अशातच दोन वर्षापासून सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा कु. माधुरी देवानंद पवार यांनी संपूर्ण मेहकर तालुक्यात एक लाख राख्यांचे वाटप करून एक नवीन आदर्श उभा केला आहे. याही वर्षी त्यांनी एक लाख राखी पाकिटे वाटप केली आहेत.
हा सण बहिण भावाच्या पवित्र बंधनाचा सण आहे, बहिण भावाचे सुंदर व प्रेमळ नाते दर्शविणारा हा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या कपाळावर टिळा लावून त्यावर अक्षदा लावते, त्याच्या मनगटावर राखी बांधते. मिठाई खाऊ घालत आणि भावाला ओवाळते. त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व पुढील वाटचालीस आपल्या भावाला ही बहीण शुभेच्छा देत असते. गेल्या दोन वर्षापासून पतसंस्थेचे अध्यक्षपद भूषवल्यानतंर मनात कल्पना येऊन सर्व अधिकारी व कर्मचार्यांना रक्षाबंधनाची पाकिटे तयार करण्यास सांगितले व रक्षाबंधनाची पाकिटे घरोघरी देण्यात आली. खेड्यापाड्यात रक्षाबंधनाची पाकिटे वाटत असताना एक वेगळाच आनंद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचार्याकडून ऐकायला मिळतात. पत्राच्या शेवटी ‘दादा बहिणीने पाठवलेल्या राखीचा स्वीकार करत, राखी नक्की मनगटावर थाटात बांधशील याची खात्री मला आहे’, असे लिहून तुमची लाडकी बहीण कुमारी माधुरी देवानंद पवार असे पत्रात लिहिले आहे. या बंधनाच्या पाकिटामुळे मेहकर तालुक्यात एक आनंदाचे वातावरण पसरले आहे.