बेंगळुरू (प्रतिनिधी) – चंद्रभूमीवर प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचा शोध घेण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोला यश आले असून, चंद्रयान-३ मोहिमेचे हे मोठे यश मानले जात आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण धृवावर फिरताना ऑक्सिजनसह नऊ मूलद्रव्यांचा शोध लावला असून, त्यात सल्फर, अॅल्युमिनीअम, कॅल्सिअम, लोखंड, क्रोमिअम, टायटेनिअम यांचा समावेश आहे. चंद्रभूमीवर सापडलेला ऑक्सिजन हा वायू स्वरूपात नसून तो ऑक्साईड घटक स्वरूपात आहे. चंद्राच्या मातीतून त्याला वेगळे करावे लागणार आहे. त्यामुळे माणसाला चंद्रावर थेट श्वास घेता येणे शक्य नाही. प्रज्ञान रोव्हर आता हायड्रोजनचाही शोध घेत असून, हायड्रोजन सापडला तर चंद्रावर पाणी तयार करणे शक्य होणार आहे. सद्या चंद्रावरील तापमान हे ५० अंशसेल्सिअस इतके आढळून आले आहे. तर मातीखालील तापमान मात्र चक्क उणे १० अंशसेल्सिअस इतके आहे. त्यामुळे ही चंद्रमोहीम भारतासह जगासाठी महत्वपूर्ण ठरली आहे.
इस्रोने चंद्राच्या भूमीवर प्राणवायू सापडल्याची बातमी देताना सांगितले, की चंद्रयान-३ वरील प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण धृवावर ऑक्सिजनचा शोध लावला आहे. यासह या भागात सल्फर, अॅल्युमिनीअम, कॅल्सिअम, लोखंड, क्रोमिअम, टायटेनिअम, मॅगनीज, सिलिकॉन असल्याची माहिती रोवरने इस्त्रोला दिली. इस्त्रोने ट्विटरवरुन ही माहिती जगाला दिली. तसेच, आता हायड्रोजनचा शोध सुरु आहे. इस्त्रोच्या विक्रम लँडरवरील चास्ते या उपकरणानं काही दिवसांपूर्वी चंद्रावरील तापमानासंदर्भात माहिती पाठवली होती. जर, चंद्रावर हायड्रोजन आढळून आला तर पाणी असल्याबद्दलच्या गृहितकाच्या जवळ जाता येऊ शकते.
चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला असून, या मोहिमेच्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण धृवावरील स्थिती संपूर्ण जगासमोर आणत आहे. प्रज्ञान रोव्हरवरच्या लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अर्थात लिब्ज या उपकरणाने हे मूलद्रव्ये शोधली असून, हे उपकरण एखाद्या पृष्ठभागावर लेझर किरणांचा मारा करून परावर्तित होणार्या प्रकाशाचा वर्णपट (स्पेक्ट्रम) तपासते आणि त्यातून त्या ग्रहावर कोणती खनिजे आहेत यांचा अंदाज येतो. तसेच, प्रज्ञान रोव्हरने पृथ्वीवर राहणार्यांसाठी एक संदेश पाठवला आहे. तो आणि त्याचा मित्र विक्रम (लँडर) दोघेही एकदम बरे असल्याचा संदेश त्याने पाठवल्याने विक्रम लँडरदेखील संशोधन कार्यात त्याला सहकार्य करत असल्याचे पुढे आले आहे.
————