NAGAR

‘ऑक्झिलीयम’च्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संपाची हाक!

– सिस्टर निलिमांच्या काळात पहिल्यांदाच शाळेत घडणार संप!

नगर (जिल्हा प्रतिनिधी) – सावेडी येथील ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट स्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली असून, ३१ ऑगस्टपासून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत, तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिस्टर निलिमा या प्रिन्सिपल बनल्यानंतर या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा संप घडून येत आहे.  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संस्था आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप केला असून, नोकरी संबंधित महत्वाचे दस्तावेजदेखील संस्थेने दिलेले नाहीत, असेही या कर्मचार्‍यांनी सांगितले.

या संस्थेचे शिक्षक अर्चना साळवे, माया मकासरे, गुरुशिल सोही, सुहास करंडे, भाऊसाहेब काळदाते, अंजली भिंगारदिवे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी गॅसपर बनसोडे, गोविंद कांडेकर विजय पठारे, निर्मला पारखे, जोनिता गायकवाड, क्रांती पघडमल, रामप्यारी जाट, यामिनी आपटे, पौर्णिमा सोनवणे, शिल्पा शिंदे, श्याम लोंढे, स्नेहल खांत, जया भाटिया, कांचन धीवर, विशाखा फिलिप, सगुना ताकवले, शांती नेरो, रचना गायकवाड, मयूर टेमक अर्चना लोखंडे या सर्वांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचला व संपाची हाक दिली. ते म्हणाले, की गेल्या अनेक वर्षापासून येथील कर्मचार्‍यांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देण्यात येत नाही, याशिवाय कर्मचार्‍यांचे नोकरी संबंधीत महत्वाचे दस्तावेज देण्यात आलेले नाहीत. सर्व्हिस बुक, पे स्लीप, अपॉईटमेन्ट ऑर्डर, कर्मचार्‍यांची शासनाकडून घेतलेली मान्यता याबाबतचे कागदपत्रे शिक्षकांना दिली जात नाही. या शाळेत कर्मचार्‍यांकडून शासकीय शाळेपेक्षा जास्त काम करुन घेतले जाते, मात्र पगार शायकीय नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. कामाचा तासांचे काही नियोजन नाही, शाळा सुटल्यावर अनेक तास थांबवून कर्मचार्‍यांना काम करण्यास भाग पाडले जाते. पगाराबाबत अनेक त्रुटी आहेत. पगार वेळेवर जमा न होणे, वरिष्ठ श्रेणी डावलणे, इंक्रिमेट न देणे, महागाई भत्त्यात नियमाप्रमाणे वाढ न करणे, विद्यार्थ्यांच्या मॅटरनिटी संबंधित तक्रारी अशा अनेक तक्रारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आहेत. हे कर्मचारी त्यांचे सर्व जीवन शाळेसाठी व मुलाच्या भविष्यासाठी देत असतात, मात्र शाळेकडून त्यांचावर अन्याय होत आहे, अशी तक्रार या सर्व कर्मचार्‍यांनी केली आहे.


३१ ऑगस्टपासून शाळा बंद?

होणार्‍या अन्यायाबाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून वारंवार शाळेच्या व्यवस्थापनाला विनंती करण्यात आली होती. मात्र शाळा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ३१ ऑगस्ट पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संप करणार आहेत, अशी माहिती ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कूलमधील या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या संपामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही, यासाठी शाळा प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावे व शाळा प्रशासनाने आडमुठे धोरण ठेवले तर विद्यार्थ्यांच्या नुकसानाला शाळा जबाबदार राहील, अशी भूमिकाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मांडली आहे. या संपामुळे ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कूल ३१ ऑगस्टपासून बंद राहणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, आणि शाळा प्रशासनाने जर यावर तोडगा काढला तर शाळा सुरळीत सुरू राहणार आहे, असेही हे कर्मचारी म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!