Breaking newsHead linesMaharashtraNAGAR

अहमदनगर नव्हे, अहिल्यानगरच!

- केंद्रीय मंत्रिमंडळाची नगरच्या नामांतरास मंजुरी - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली माहिती

नगर (बाळासाहेब खेडकर) – केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने महाराष्ट्र विधानसभेपूर्वी महत्वपूर्ण निर्णय घेत, अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी होत होती. यादरम्यान, या मागणीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारनेदेखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे पशुसंवर्धन, महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.
अहिल्यानगर या नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, केंद्राकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव असल्यामुळे अहिल्यानगर होणार का नाही? याबाबत संभ्रम अवस्था असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल औरंगाबाद हायकोर्टामध्ये अहमदनगरचे नाव बदलू नये, म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र आता केंद्र सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिल्याने ही चर्चा बंद होणार आहे. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत, या निर्णयाचे स्वागत, करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!