चिखलीत आजी-माजी आमदारांसह तुपकरांच्या उमेदवारामुळे निवडणुकीत येणार चुरस!
- आ. श्वेताताई महाले, राहुल बोंद्रे हे 'फिक्स'; तुपकरांकडून विनायक सरनाईक संभाव्य उमेदवार!
– ज्योतीताई खेडेकर, नरहरी गवई यांच्याकडूनदेखील पक्षाकडे उमेदवारीची चाचपणी!
चिखली/बुलढाणा (संजय निकाळजे) – विधानसभा निवडणुकीसाठी या किंवा पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता पाहाता, राजकीय वातावरण चांगलेच पेटू लागले आहे. महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील याच पुन्हा रिंगणात राहणार असून, महाआघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे हे उमेदवार निश्चित आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीदेखील या मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्याने, शेतकरी नेते विनायक सरनाईक हेच तुपकरांचे येथील उमेदवार राहतील, अशी राजकीय चर्चा असून, सरनाईक यांचे शेतकरी चळवळीतील योगदान पाहाता, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर ज्योतीताई खेडेकर, नरहरी गवई यांनीदेखील आपआपल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असून, मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून ठरल्या नसल्या तरी, आजी-माजी आमदार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार असून, आम्हीच विजयी होणार यासाठी कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. तथापि, महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षातील इतरही बरेच जण चिखली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील आपला उमेदवार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यादृष्टीकोनातून त्यांचे कट्टर समर्थक शेतकरी चळवळीतील आक्रमक नेते विनायक सरनाईक हे तुपकरांचे संभाव्य उमेदवार निश्चित मानले जात आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका शक्यतोवर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने याच महिन्यात आचारसंहिता लागू शकते. अजून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी जो-तो आपआपल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास आजी-माजी आमदार एकमेकांच्या आरोप, प्रत्यारोपाच्या कामात गुंतले असून, दोघेही आपणच उमेदवार आहोत व जिंकूसुद्धा, असा दावा करीत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षातील काहीजणसुद्धा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला चिखली विधानसभा मतदारसंघ आलेला असल्याने माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे हे सध्या दावेदार आहेत. त्यांच्यासह अजून एक-दोन जण लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीनेसुद्धा काहीजण इच्छुक असून, त्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योतीताई खेडेकर यांनी मतदारसंघात भेटीगाठी आणि संपर्क वाढवला आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीनेदेखील इच्छुकांची संख्या बरीच आहे. महायुतीतील भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांची उमेदवारी निश्चित असली तरी, भाजपचेच दोन-तीन जण निवडणूक लढविण्यासाठी तयार आहेत. आजी-माजी आमदार सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असून, त्यांच्या या आरोप-प्रत्यारोपाचा वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी विचार केल्यास उमेदवारी नवख्या एखाद्या उमेदवारालासुद्धा मिळू शकते. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनीसुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघ मिळावा, यासाठी मागणी केली आहे. त्यामध्ये रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई हे इच्छुक असून, ते सध्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. या अगोदर ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. तर दुसरा घटक पक्ष असलेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनीसुद्धा या मतदारसंघाची मागणी केली असून, जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई हेसुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्यांनी या अगोदर इसोली जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवली होती, त्यामध्ये ते फक्त ६ मताने पराभूत झाले होते. तर मेरा खुर्द जिल्हा परिषद गटात ७६ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा उमेदवाराची चाचपणी करणे सुरू केले आहे. ते येथून ओबीसी उमेदवाराच्या शोधात असून, सध्या एससी प्रवर्गातून त्यांच्याकडे दोन-तीन उमेदवार निवडणुकीसाठी तयार आहेत. मागील पंचवार्षिकला वंचित बहुजन आघाडीमुळेच विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांचा निसटता विजय झाला होता, तर माजी आमदार राहुल बोंद्रे यांना अवघ्या पाच ते सहा हजारांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्याचप्रमाणे या मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असून, त्यांना लोकसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळालेले होते. त्यामुळे त्यांचीही चिखली विधानसभा मतदारसंघात भरभक्कम बाजू आहे. तुपकरांचे कट्टर समर्थक व शेतकरी चळवळीतील आक्रमक नेते तथा तुपकरांची सावली म्हणून ओळख असलेले विनायक सरनाईक हेच या मतदारसंघात उमेदवार असतील, हे निश्चित मानले जात आहे. याव्यतिरिक्त शेतकरी संघटनेसह बहुजन समाज पार्टी, रिपब्लिवâन पार्टी ऑफ इंडिया (राजरत्न आंबेडकर) यांच्यासह इतरही पक्ष आपापल्या पद्धतीने उमेदवार उभा करणार असल्याने चिखली विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आत्तापासूनच बघावयास मिळत आहेत. दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने या मतदारसंघात यापूर्वी निवडणूकपूर्व सर्वेक्षण घेण्यात आले असता, श्वेताताई महाले यांनाच लोकांनी पुन्हा पसंती दिली होती, हेही विशेष.